सायबर गुन्हे हाताळण्याचे २३० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
By admin | Published: January 24, 2016 12:32 AM2016-01-24T00:32:59+5:302016-01-24T00:32:59+5:30
महाराष्ट्रात प्रथमच विदर्भातील २३०पेक्षा जास्त अधिकारी नागपूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) सायबर आणि टेप फोरेन्सिक्सचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच विदर्भातील २३०पेक्षा जास्त अधिकारी नागपूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) सायबर आणि टेप फोरेन्सिक्सचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच त्यात पुराव्यांची जमवाजमव करण्यासाठी अधिकाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. मूळ चित्रांमध्ये फेरफार वा बदल करून (मॉर्फड् इमेजेस) कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रकार कसे रोखायचे, याचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात आल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. सायबर गुन्हे हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यास पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सांगण्यात आले आहे. महासंचालक (विधी व तांत्रिक) मीरा बोरवणकर यांनी त्यानुसार प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रत्यक्ष गुन्हा घडताना व्हिडीओ टेपचे रेकॉर्डिंग झाले आहे किंवा अन्य कोणीतरी त्यात बदल केला आहे, याचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण आम्ही विदर्भातील ३० अधिकाऱ्यांना दिले आहे. दुसऱ्या सत्रामध्ये २००पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांना (निरीक्षक आणि उपअधीक्षक दर्जाचे) सायबर गुन्ह्यांतील पुरावे कसे हाताळायचे व ते जपायचे, याची माहिती देण्यात आल्याचे नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उप संचालक नितीन चुटके यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना हॅश व्हॅल्यू आणि हॅश व्हॅल्यू कॅलक्युलेशन तंत्राची माहिती देण्यात आली. प्रत्येक व्हिडीओ आणि आॅडिओला एक स्वतंत्र हॅश व्हॅल्यू असते. त्यात फेरफार केल्यास हॅश व्हॅल्यूमध्ये बदल होतो. नेमका किती फेरफार करण्यात आला. हे शोधण्याचे प्रशिक्षणही पोलिसांना दिल्याचे नितीन चुटके यांनी सांगितले.
नागपूर, अमरावती आणि गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना कॉम्प्युटर फोरेन्सिक्स, पायरसी, सॉफ्टवेअर मॅन्युपलेशन, मोर्फींग आणि एमएमएस स्कँडल्स अशा बाबींचाही प्रशिक्षणात अंतर्भाव होता. मूळ छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करून ते सोशल मीडियावर व्हायरल होण्यामुळे अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकरणात पुरावे कसे गोळा करायचे, ते कसे जतन करून ठेवायचे व प्रयोगशाळांकडे सुपुर्द करायचे, याचे राज्यात प्रथमच प्रशिक्षण दिल्याचे नितीन चुटके म्हणाले.