‘आयएनएस सिंधुरक्षक’वर होणार प्रशिक्षण केंद्र
By admin | Published: November 18, 2015 03:05 AM2015-11-18T03:05:51+5:302015-11-18T03:05:51+5:30
अपघातग्रस्त आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी सेवेतून कमी करण्याचा विचार असतानाच आता याच पाणबुडीवर नौदलासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
- सुशांत मोरे, मुंबई
अपघातग्रस्त आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी सेवेतून कमी करण्याचा विचार असतानाच आता याच पाणबुडीवर नौदलासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नौदलाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. २0१३ मध्ये मुंबईतील समुद्रात अपघात होऊन या पाणबुडीवर १८ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ही पाणबुडी निवृत्त केली जाणार होती.
आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला विशाखापट्टणम येथे आग लागली होती. यात एका खलाशाचा मृत्यू झाला. अपघातानंतर सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि सुधारणांसाठी रशियात पाठविण्यात आले.जानेवारी २0१३ मध्ये ती पुन्हा नौदलाच्या सेवेत आली. १४ आॅगस्ट २0१३ रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत शस्त्रांनी भरलेल्या या पाणबुडीत स्फोट होऊन आग लागली आणि यात १८ कर्मचाऱ्यानी प्राण गमवले. या घटनेत सिंधुरक्षकला जलसमाधी मिळाली होती. १७ जून २0१४ला पाणबुडीला बाहेर काढण्यात यश आले. मुंबईत नौदलाच्या गोदीत उभ्या असलेल्या या पाणबुडीची डागडुजीही करण्यात आली. मात्र नंतरही तीला वापरात आणणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिला सेवेतून कमी करण्यात येणार होते. अखेर या पाणबुडीवर नौदलासाठीच प्रशिक्षक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाआहे. नौदल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सेवेतेल्या पाणबुडीत जावे लागते आणि प्रत्यक्षात प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र पूर्व प्रशिक्षण देणारी सेवा नौदलाकडे नसल्याने या पाणबुडीवर तसे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील अशा प्रकारचे पहिले केंद्र असून यावर संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच निर्णयही घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
या पाणबुडीला मुंबईतील समुद्रात स्फोटानंतर जलसमाधी मिळाली होती. पाणबुडीला बाहेर काढणे गरजेचे होते; तशी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. अखेर आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली. यात साल्वेज अॅण्ड फाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेला याचे काम देण्यात आले आणि तब्बल २00 कोटी रुपये ही पाणबुडी बाहेर काढण्यासाठी खर्च केले.