शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रशिक्षण सुरू
By admin | Published: February 20, 2017 04:21 AM2017-02-20T04:21:54+5:302017-02-20T04:21:54+5:30
मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षक गेल्या पाच वर्षांपासून निवडश्रेणीच्या प्रशिक्षणापासून वंचित होते. अखेर शिक्षण विभागाने
मुंबई : मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षक गेल्या पाच वर्षांपासून निवडश्रेणीच्या प्रशिक्षणापासून वंचित होते. अखेर शिक्षण विभागाने मुंबईत प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, शिक्षकांना या प्रशिक्षणामुळे आर्थिक लाभ मिळणार आहे.
शिक्षक परिषदेच्या आमदारांनी २७ जुलै २०१६ रोजी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी केली होती. शिक्षकांच्या सोयीने मुंबईतील शिरोडकर अध्यापक विद्यालयात शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाने शिक्षक परिषदेला दिले होते. त्यानुसार मुंबईतील सेवांतर्गत प्रशिक्षणापासून वंचित असलेल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
बोरनारे यांनी शिक्षक परिषदेतर्फे या प्रशिक्षण वर्गाला भेट देत शिक्षकांशी संवाद साधला. लवकरच या विषयावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण सचिवांची भेट घेणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)