निवडणूक कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण
By admin | Published: January 29, 2017 02:07 PM2017-01-29T14:07:39+5:302017-01-29T14:07:39+5:30
महापालिकेने निवडणूक कामासाठी ६,७८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच मतदान व मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारीही सुरू झाली असून, निवडणूक कामासाठी नियुक्त ६,७८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दि. ५ व १२ फेबु्रवारीला रविवारी सुटीच्या दिवशी सदर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारीला मतदान, तर दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकेने निवडणूक कामासाठी ६,७८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांसह विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी आधी सुटीचा दिवस सोडून तारखा ठरविण्यात आल्या होत्या. परंतु, काही शिक्षक संघटनांनी कामाच्या दिवशी प्रशिक्षण ठेवल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी तक्रार केली होती.