राज्यातील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आयटी संचालकपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:33 PM2021-08-20T22:33:50+5:302021-08-20T22:36:50+5:30
रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे.
मुंबई - रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Choudhari) यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, आता त्यांच्या जागी महेंद्र कल्याणकर हे रायगडचे जिल्हाधिकारी असतील. निधी चौधरी यांनी १ जानेवारी २०२० रोजी रायगड जिल्हाधिकारी पदाची धुरा स्वीकारली होती. (Transfers of eight officers in the state; Raigad Collector Nidhi Chaudhary as IT Director at Mumbai)
रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या -
- डॉ महेंद्र कल्याणकर यांची रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
- एम. बी. वरभुवन हे मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव होते. त्यांना बदली करून ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- अजित पवार यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- संजय दैने यांना हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.