ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:38 AM2020-06-24T05:38:31+5:302020-06-24T05:39:39+5:30
सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते.
मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि ठाणे महापालिका आयुक्तांची बदली केली. ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड आता मीरा-भार्इंदर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत तेथे आयुक्त असलेले चंद्रकांत डांगे हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.आर. दयानिधी यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तेथील आयुक्त समीर उन्हाळे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (गुन्हे) असलेले डॉ. संतोष रस्तोगी यांची बदली दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अतिरिक्त निवासी आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांची
ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यांत मंगळवारी त्यांची बदली झाली. आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे
त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू झाली.