राज्यातील तब्बल ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनीषा म्हैसकर सामान्य प्रशासन विभागात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:03 AM2022-09-30T06:03:48+5:302022-09-30T06:07:41+5:30
राजेश नार्वेकर नवी मुंबई मनपाच्या आयुक्तपदी, तुकाराम मुंढेंचीही बदली.
राज्य सरकारने गुरूवारी रात्री उशिरा राज्यातील तब्बल ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात सोपवण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अशोक शिंगारे यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीये. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय म्हैसकर यांच्याकडे मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त भारही असेल.
गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती राज्य उत्पादन शुल्क व विमान चालन प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बदली आदिवासी विभाग अपर मुख्य सचिव या पदावर करण्यात आली आहे. एमएसईबीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची नियुक्ती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवपदी करण्यात आली. तर तुकाराम मुंढे आयुक्त आणि संचालक एन एच एमपदी नियुक्ती करण्यात आली.
विवेक भिमानवार परिवहन आयुक्त
राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांची नियुक्ती पर्यावरण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. असंघटित कामगार विकास आयुक्त अश्विनी जोशी यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सचिव म्हणून करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय राजेंद्र निंबाळकर यांची एम.एस.एस.आय.डी.सी.च्या व्यवस्थापकीय संचालकपदी, विवेक भिमानवार राज्य परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आदिवासी विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची नियुक्ती अल्पसंख्याक विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. काळे यांची नियुक्ती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय या पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे असेल.
उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती उद्योग ऊर्जा व कामगार विभाग प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांची नियुक्ती आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय काही अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.