राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:15 AM2019-02-26T05:15:57+5:302019-02-26T05:15:59+5:30
एटीएसचे सुहास वारके झाले कोल्हापूरला पोलीस महानिरीक्षक
मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास आठवडाभराचा अवधी उरला असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी जाहीर केल्या. त्यानुसार नाशिकचे आयुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा पदभार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविला आहे.
नांगरे- पाटील यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथकातील महानिरीक्षक सुहास वारके यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह आठ विशेष महानिरीक्षक, चार उपमहानिरीक्षक, दहा अधीक्षक, सहा अप्पर अधीक्षक, १३ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महानिरीक्षक दर्जाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक पी.पी. मुत्याल यांची नांदेड परिक्षेत्रात बदली झाली. तेथील एफ.के. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील रिक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. सीआयडीचे सुनील रामानंद यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळातील प्रवीण साळुंखे यांची बदली करण्यात आली.
नाशिक ग्रामीणचे अधीक्षक संजय दराडे यांची पदोन्नतीवर विक्रीकर विभागात नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे एटीएसमधील उपमहानिरीक्षक दत्ता कराळे यांची ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात बदली केली आहे. तेथील प्रताप दिघावकर यांना एक पद पदावनत केलेल्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाकडे नियुक्ती केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची एटीएसला बदली करण्यात आली आहे.
देवेन भारती यांना मिळाले अभय
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. मात्र मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना मात्र अभय देण्यात आले आहे. वास्तविक १५ एप्रिलला त्यांना या पदावर चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना आयोगाच्या निर्देशातून अभय देण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. निवडणुकांनंतर पदोन्नती देऊन त्यांची या ठिकाणाहून अन्यत्र बदली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येते