हजारो शिक्षकांच्या ऐन दिवाळीत बदल्या, राज्यभरातील १५ हजार ७६६ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:42 AM2017-10-02T04:42:10+5:302017-10-02T04:42:25+5:30
राज्यातील २९ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १५ हजार ७६६ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले आहेत.
सुरेश लोखंडे
ठाणे : राज्यातील २९ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १५ हजार ७६६ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले आहेत. शिक्षकांच्या नावानिशी जाहीर केलेल्या या याद्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या ३७४ शिक्षकांचा समावेश आहे.
बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांना नवीन शाळा निवडीसाठी २ आॅक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षकांना आॅनलाइन फॉर्म भरण्याची मुदतही देण्यात आली आहे. यानंतर, आगामी एक-दोन दिवसांत ऐन दिवाळीत या बदल्या होत असल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मात्र, पुणे जिल्ह्यासह बीड, हिंगोली आणि भंडारा या चार जिल्ह्यांतील बदल्या वेटिंगवर ठेवण्यात आलेल्या आहेत. राज्यभरात प्रथमच या आॅनलाइन बदल्या होत आहेत. यात पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या नावांची यादी नियमानुसार सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी राज्यभर प्रसिद्ध केलेल्या या याद्यांमधील शिक्षकांना त्यांची नवीन शाळा निवडण्यासाठी अवघ्या चार दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत संबंधित शिक्षकाने जागा रिक्त असलेल्या २० शाळांची निवड आॅनलाइन करण्याचे आदेश जारी झाले आहेत.
अपंग, विधवा व ५३ वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या शिक्षकांचा, प्रथम संवर्गासह मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावरील पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग आणि अवघड क्षेत्रातील शाळा या तीन संवर्गांमधील शिक्षकांनी त्यांच्या पसंतीच्या शाळांची मागणी केली आहे. यामुळे तेथील शिक्षक संवर्ग चार अंतर्गत बदलीस पात्र ठरविण्यात आला आहे. यानुसार, राज्यभरातील १५ हजार ७६६ शिक्षकांच्या तडकाफडकी बदल्या घोषित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यांतर्गत होत असलेल्या या बदल्या या आधी जिल्हा परिषदेद्वारेच केल्या जात होत्या. मात्र, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारीच्या अद्यादेशानुसार, या आॅनलाइन बदल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार, या जिल्ह्यांतर्गत बदल्या होत आहेत. या बदल्यांविरोधात काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
ऐन दिवाळीत बदली होत असलेल्या शिक्षकांमध्ये १५ हजार ३५३ मराठी भाषिक शिक्षक आहेत. या खालोखाल ३८५ उर्दूभाषिक आहेत. कानडी भाषिक १८, तेलगू भाषिक तीन आणि चार हिंदी भाषिक शिक्षकांच्या या बदल्या जिल्ह्यांतर्गत होत आहेत. या बदल्यांमध्ये अपंग, विधवा व ५३ वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेले शिक्षक, मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावरील पती-पत्नी एकत्रीकरणाच्या कारणाखालील शिक्षक आणि अवघड क्षेत्रातील शाळा म्हणजेच, आदिवासी, दुर्गम भागातील व वाहन व्यवस्था नसलेल्या भागातील शिक्षकांची, त्यांच्या पसंतीनुसार शाळेत बदली करण्यात आली आहे.