लोकसहभागातून ६० आरोग्य केंद्रांचा ‘कायापालट’
By admin | Published: September 15, 2014 03:59 AM2014-09-15T03:59:23+5:302014-09-15T03:59:23+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘कायापालट अभियाना’मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले आहे
राजाराम लोंढे, कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘कायापालट अभियाना’मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले आहे. ७२ पैकी ६० आरोग्य केंद्रांत लोकसहभागातून ३ कोटींची कामे झाल्याने या केंद्रांचा चेहरा-मोहरा बदलला आहे. कोल्हापूरची ही नावीन्यपूर्ण योजना राज्याने स्वीकारली आहे.
शासन आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून समाजातील सर्वांत शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. शाळा, आरोग्य केंद्रांचे कामकाज लोकसहभागाने अधिक गतिमान होते. शाळांमध्ये पालकांमधून शाळा व्यवस्थापन समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणामही आपण पाहत आहोत. त्याच धर्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बळकटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा होता. शासनाच्या निधीतून आरोग्य केंद्रांचा विकास होण्यावर मर्यादा येत असल्याने लोकसहभागातून आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याची संकल्पना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांनी पुढे आणली. सुरुवातीला ७२पैकी ६६ आरोग्य केंद्रांमध्ये हे अभियान सुरू केले. त्यापैकी ६० ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.
‘आमचा दवाखाना’ ही भावना या अभियानातून ग्रामस्थांमध्ये रूजली. आरोग्य केंद्रांच्या इमारतीची रंगरंगोटी, रुग्णांसाठी बसण्याची व्यवस्था, पाण्याची सोय, परिसरातील स्वच्छता यामध्ये लोकांचा सहभाग घेतला. लोकांनी स्वत:च्या पैशांतून ही कामे केल्याने त्यांना आरोग्य केंद्रांबद्दल आत्मीयता निर्माण होते. परिणामी, केंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने ‘ओपीडीं’ची संख्याही वाढली आहे.