परिवर्तनाची लाट

By admin | Published: February 24, 2017 06:19 AM2017-02-24T06:19:25+5:302017-02-24T06:19:25+5:30

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम

Transformation wave | परिवर्तनाची लाट

परिवर्तनाची लाट

Next

नंदकिशोर पाटील / मुंबई
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आलेली राजकीय परिवर्तनाची लाट दोन अडीच वर्षानंतरही कायम असल्याचे राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालावरून दिसून येते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, त्याचीच पुनर्रावृत्ती या निवडणुकीत झाली. नोटाबंदी, शेतीमालाचे पडलेले भाव, सहकारी संस्थांवर सरकारने आणलेला अंकुश आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा जबर फटका राज्यातील सत्ताधारी भाजपाला बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मतदारांनी सगळे राजकीय अंदाज धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणले. भाजप-शिवसेनेच्या लाटेत सांगली, लातूर, वर्धा हे काँग्रेसचे बालेकिल्ले अक्षरश: भुईसपाट झाले. संख्याबळाचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादीला २५ पैकी ११ तर शिवसेना-भाजपाला १३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. सर्वाधिक ४११ जागा जिंकून भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून गतवेळी क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादीला ३५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शेकापला रायगडची जिल्हा परिषद मिळाली आहे.
मागील २०१२ च्या निवडणुकीत भाजपला सातारा, सांगली, सोलापूर व हिंगोली या जिल्हा परिषदांमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. तिथे जोरदार मुसंडी मारत या पक्षाने सांगलीत परिवर्तन घडवून आणले, तर सोलापूरमध्ये १५ आणि हिंगोलीत दहा जागा  जिंकल्या. शिवाय, लातूर वर्धा, जळगाव, बुलडाणा आणि चंद्रपूर या जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला सातारा, सांगली व सोलापूरमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती.
तिथे आता सेनेने खाते उघडले आहे. एवढेच नव्हे, तर रत्नागिरी, रायगड , औरंगाबाद आणि नाशिकमध्ये भाजपाच्या मदतीने सेनेला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सांगली आणि लातूर हे दोन मोठे गड ढासळले. सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील भाडणाचा फटका बसला. तर लातुरात मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाचे कमळ फुलवून काँग्रेसला धोबीपछाड दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिंकून काँग्रेसची लाज राखली. २०१२ च्या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेत एकही उमेदवार निवडून आणता आलेला नव्हता, यावेळी सहा जागा मिळाल्या आहेत. 
गतवेळी जिल्हा परिषदांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बीड, पुणे आणि सातारा या तीनच जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राखता आली. या निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तर परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर आणि गडचिरोली अशा आठ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळू शकते. 

सांगलीत सत्तांतर
सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर खातेही न उघडलेल्या भाजपने यंदा जोरदार मुसंडी मारत थेट सत्तेपर्यंत मजल मारली.

पुण्यात राष्ट्रवादी
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी विश्वास दाखवत जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात दिल्या आहेत.

साताऱ्यात उदयनराजे
काँग्रेस, भाजप, शिवसेना या पारंपरिक शत्रूंना तोंड देत असतानाच पक्षाचेच खासदार उदयनराजेंविरोधात संघर्ष करण्याची पाळी आलेल्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपले पाशवी बहुमत सिद्ध केले.


पंकजा मुंडे यांना धक्का
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जोरदार धक्का बसला आहे. परळी पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नगरपालिकेपाठोपाठ पंचायत समितीत एकहाती सत्ता आणली. अजित पवार यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे परळीत राष्ट्रवादीला फटका बसेल , असे मानण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही.

राणेंनी गड राखला
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

Web Title: Transformation wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.