संक्रमण शिबिराचे धोरण फेब्रुवारीत
By admin | Published: January 13, 2016 02:25 AM2016-01-13T02:25:05+5:302016-01-13T02:25:05+5:30
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमध्ये सुमारे १० हजार जणांनी घुसखोरी केली आहे. या घुसखोरांना पात्र-अपात्र करण्याबाबतचे धोरण पुढील महिन्यात
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमध्ये सुमारे १० हजार जणांनी घुसखोरी केली आहे. या घुसखोरांना पात्र-अपात्र करण्याबाबतचे धोरण पुढील महिन्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची शहर आणि उपनगरात ५६ संक्रमण शिबिरे आहेत. या शिबिरांमध्ये सुमारे १0 हजार जणांनी घुसखोरी केल्याचे म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. घुसखोर म्हाडाला कोणतेही भाडे न भरता राहत आहेत; तसेच या खोल्यांवर ते मालकीहक्क सांगत असल्याने म्हाडाने त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम घेऊन कायम करण्याचा विचार म्हाडा करत आहे. त्यानुसार शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.
या निर्णयाबाबत गृहनिर्माण मंत्री महेता यांना विचारले असता, त्यांनी संक्रमण शिबिराचे धोरण फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात येईल, असे सांगितले. शासनाने निर्णय घेतल्यास संक्रमण शिबिरातील घुसखोरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
धारावीत रहिवाशांच्या विरोधाची शक्यता?
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर ५ चे काम म्हाडामार्फत करण्यात येत आहे. म्हाडाने धारावीत ३५८ घरांची इमारत उभारली आहे. क्लस्टर जे मधील रहिवाशांची पात्रता निश्चित झाल्याने या घरांच्या वितरणासाठी २६ जानेवारीला लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने सुरु केली आहे. परंतु ही घरे ३00 चौरस फुटाची असल्याने त्याला रहिवाशांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.