‘गीतरामायण’चा आठ भाषांमध्ये अनुवाद
By admin | Published: March 28, 2017 02:55 AM2017-03-28T02:55:59+5:302017-03-28T02:55:59+5:30
गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची सिद्धहस्त लेखणी आणि त्यांच्या शब्दांना सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी
पुणे : गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांची सिद्धहस्त लेखणी आणि त्यांच्या शब्दांना सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी चढविलेला स्वरसाज अशा दोन प्रतिभासंपन्न दिग्गजांच्या परिश्रमातून साकार झालेली अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’. सांस्कृतिक एकात्मकतेचे प्रतीक असलेले आणि रामायणाचा मूळ आत्मा असलेले हे गीतरामायण आज आठ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, या भाषांमध्ये त्याचे विविध कार्यक्रम होत आहेत. उद्या (बुधवारी) विश्व हिंदू परिषद आणि भारत विकास परिषद यांच्या वतीने गरवारे कॉलेज येथे ‘गीतरामायण’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच येत्या १0 एप्रिल रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पहिल्यांदाच गीतरामायणाचे सूर गुंजणार असल्याची माहिती गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी दत्ता चितळे, श्रीनिवास कुलकर्णी, रमेश विश्वरूपे, हेमंत धर्मावत, किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत. काही दुर्मीळ आठवणी आणि गीतरामायणाच्या आजपर्यंतच्या वाटचालीमधील काही रंजक किस्से ते कथन करतील. पुण्यातील कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर करणार आहेत. (प्रतिनिधी)
भारत विकास परिषदेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून गीतरामायणाचा कार्यक्रम श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सादर केला जातो. एक छंद म्हणून आणि गीतरामायणाबद्दलचे मनस्वी आकर्षण म्हणून दत्ता चितळे यांनी गीतरामायणाचा अभ्यास करून ते प्रभावीपणे आत्मसात केले आहे. हा कार्यक्रम गायक दत्ता चितळे, तुषार रिठे, प्रार्थना साठे, राधिका इंगळहळ्ळीकर, भक्ती दातार आदी कलाकार सादर करणार आहेत. उद्या (बुधवार) गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कार्यक्रम सादर होणार आहे.