आरटीओतून परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’

By admin | Published: December 7, 2014 12:24 AM2014-12-07T00:24:00+5:302014-12-07T00:24:00+5:30

एरवी तपासणीच्या नावाखाली वाहनांचा पैशासाठी दूरपर्यंत पाठलाग करणारी आरटीओची यंत्रणा सध्या चक्क आपल्याच खात्याच्या परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’ करीत आहे. हिवाळी अधिवेशन काळात

Transport Authority's 'chase' from RTO | आरटीओतून परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’

आरटीओतून परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’

Next

दौऱ्याचा धसका : विदर्भातील आरटीओ कार्यालये सतर्क
राजेश निस्ताने - यवतमाळ
एरवी तपासणीच्या नावाखाली वाहनांचा पैशासाठी दूरपर्यंत पाठलाग करणारी आरटीओची यंत्रणा सध्या चक्क आपल्याच खात्याच्या परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’ करीत आहे. हिवाळी अधिवेशन काळात होणारा आयुक्ताचा संभाव्य दौरा हे यामागील प्रमुख कारण आहे.
अन्न व औषधी प्रशासन विभाग राज्यभर गाजविणारे सनदी अधिकारी महेश झगडे आता राज्याचे परिवहन आयुक्त झाले आहेत. औषध प्रशासनातील धुमधडाका त्यांनी परिवहन खात्यातही सुरू केला आहे. पहिल्याच टप्प्यात त्यांनी मुंबई व परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आपल्या निशाण्यावर घेतली. ग्राहक बनून खिडकीवर उभे राहत झगडे यांनी आरटीओत चालणाऱ्या ‘उलाढालीं’चा स्वत: अनुभव घेतला. आता झगडे यांचा मोर्चा विदर्भाकडे वळणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मी विदर्भात येणार, असे झगडे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. मात्र झगडे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते विदर्भात केव्हाही आणि कुठेही अकस्मात भेट देण्याची, ग्राहक बनून परवान्यासाठी खिडकीवर उभे राहण्याची दाट शक्यता आहे. आरटीओ यंत्रणेने याची प्रचंड धास्ती घेतली आहे. म्हणूनच आरटीओतील आर्थिक उलाढालीशी अगदी जवळचा संंबंध असलेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता चक्क महेश झगडे यांचाच फोनवरून ‘पाठलाग’ सुरू केला आहे. यातील काही कर्मचारी थेट परिवहन आयुक्तांच्या मुंबई कार्यालयात आपल्या ‘कनेक्शन’ मधील यंत्रणेशी सातत्याने संपर्कात आहेत. महेश झगडे नेमके कुठे आहेत, त्यांचे ‘लोकेशन’ काय, हे तपासले जात आहे. झगडे यांचा संभाव्य दौरासुद्धा मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. एकूणच झगडे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण विदर्भातील आरटीओ कार्यालयांमधील यंत्रणा सतर्क झाली आहे. एरवी दुपारी १२ पर्यंत खुर्चीकडे न फिरकणारे आणि सतत टपरीवर दिसणारे कर्मचारी आता नियोजित वेळेच्या १० मिनिटे आधीच स्थानापन्न होताना दिसत आहेत. साहेब स्वत:च रांगेत असू शकतात म्हणून खिडकीवरील प्रत्येक माणसाचा चेहरा पाहून त्याला वागणूक दिली जात आहे. चांगल्या कपड्यात दिसणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेणे टाळले जात आहे. झगडे यांच्या दौऱ्याच्या भीतीने आरटीओतील आर्थिक उलाढाल नियंत्रणात आहेत. मात्र काही ‘दीर्घ अनुभवी’ कर्मचारी परिवहन आयुक्तांच्या दौऱ्याच्या सावटातही आपला ‘वाटा’ सोडण्यास तयार नाहीत. सजग राहून रिस्क घेऊन हे कर्मचारी आपली ‘उलाढाल’ चालूच ठेवत आहेत. यावरून हे कर्मचारी किती ‘पट्टी’चे असावे याचा अंदाज येतो.
परिवहन आयुक्तांच्या कामाच्या वेगळ्या पॅटर्नमुळे आर्थिक उलाढालीची सवय झालेल्या आरटीओतील संबंधित यंत्रणेचा सध्या पैशाविना जीव कासावीस होतो आहे. झगडे कुणाला जुमानतही नाहीत आणि मुदतपूर्व त्यांची बदलीही कुणी करू शकत नाहीत, याचा अंदाज आल्यानेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता त्यांच्या सेवानिवृत्तीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कुणी त्यांचे सहा महिने राहिल्याचे सांगत आहे तर कुणी ते फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त होणार असल्याचे बोलतो आहे. यावरून झगडे यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत टाईमपास करायचा आणि ते निवृत्त होताच पुन्हा वाहनधारकांना एजंटांच्या माध्यमातून लुटण्याचा गोरखधंदा सुरू करायचा, अशी या यंत्रणेची मानसिकता स्पष्ट होते.

Web Title: Transport Authority's 'chase' from RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.