महापौर मॅरेथॉनसाठी वाहतूक बदल
By admin | Published: August 27, 2016 04:15 AM2016-08-27T04:15:27+5:302016-08-27T04:15:27+5:30
ठाणे महापालिका आयोजित २७ वी महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्टला महापालिका भवन येथे होणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिका आयोजित २७ वी महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्टला महापालिका भवन येथे होणार आहे. या वेळी येणारे ३० ते ३५ हजार स्पर्धक नियोजित मार्गांवरून धावणार असून त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता लक्षात घेता सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याप्रसंगी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. तसेच स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वाहन पार्किंग करण्यास मनाई केली आहे.
नितीन कंपनी जंक्शन (सिग्नल) येथून डावीकडे अगर उजवीकडे वळण घेऊन कॅडबरी जंक्शन, तीनहातनाका जंक्शनमार्गे वाहने पुढे जातील. तसेच अल्मेडा चौकाकडून महापालिका भवनाकडे जाणारी वाहने ही एलबीएस मार्गाने खोपटमार्गे अथवा संत गजानन महाराज चौक-राममारु ती रोडने, नितीन सिग्नल ते तीनहातनाका सर्व्हिस रोडने जाणाऱ्या वाहनांना नितीन सिग्नल येथे तसेच तीनहातनाका ते नितीन सिग्नल सर्व्हिस रोडने जाणाऱ्या वाहनांना तीनहातनाका येथे प्रवेशबंदी घातली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाने धावणार आहेत. तीनहातनाका ते हरिनिवास सर्कलकडे जाणारी वाहने तीनहातनाका, भोईर रेस्टॉरंट-टेलिफोननाका नौपाडा पो.स्टे.समोरून पुढे सरकतील. विष्णूनगर, घंटाळी-नौपाडा परिसरातून वीर सावरकरमार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहने राममारु ती रोडवरील आयसीआयसीआय बँक-नमस्कार हॉटेलमार्गे इच्छित स्थळी जातील. दगडी शाळा येथून सेंट जॉन हायस्कूलकडे जाणारी वाहतूक बंद करून ही गजानन चौकाकडून अथवा अल्मेडा चौकातून पुढे जाणार आहे.
कोपरी सर्कलकडून गुरु द्वारामार्गे तीनहातनाका येथे येणारी वाहतूक कोपरी सर्कल येथेच थांबवली असून ती कोपरी सर्कल -टाइम्स आॅफ इंडिया बिल्डिंग-टेलिफोननाका-हरिनिवास सर्कल एमजी रोडने तर चरई-बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर व उथळसर परिसरातील वाहने ही एलबीएस रोडने व मीनाताई ठाकरे चौकाकडून ठाणे स्टेशन व नौपाडा परिसरात जाणारी वाहने ही मीनाताई ठाकरे चौक-के व्हिला-जीपीओ-कोर्टनाकामार्गे अथवा मीनाताई ठाकरे चौक-एलबीएस रोडने खोपट जंक्शन-अल्मेडा चौक-संत गजानन महाराज चौक-राममारुती रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.
मीनाताई ठाकरे चौकाकडून गोल्डन डाइज नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जीपीओ-कोर्टनाका-साकेत रोड ते महालक्ष्मी मंदिर ते नाशिक- मुंबई हाय वे मार्गे आणि डॉ. मुस चौक अथवा साईकृपा हॉटेल-राममारु ती रोडने पुढे जातील. एलबीएस रोडने तीनहातनाका येथून पूर्व द्रुतगती मार्गावरून जातील. तसेच शिवाईनगर, उपवन बाजूकडून नीळकंठ हाइट्समार्गे वसंतविहार, गांधीनगर, कापूरबावडीकडे जाणाऱ्या वाहनास उत्तरेकडील वाहिनीवरून वाहतुकीस प्रवेश बंद केल्याने या वाहनांना दक्षिणेकडील एकाच वाहिनीचा वापर करता येणार आहे.
कापूरबावडी बाजूकडून वसंतविहार, गांधीनगर चौकमार्गाने (बॅ. नाथ पै. रोड) डॉ. काशिनाथ घाणेकर, खेवरा सर्कल, टिकुजिनीवाडी सर्कलकडे जाणाऱ्या वाहनास पश्चिमेकडील वाहिनीवरून गांधीनगर चौक येथून टिकुजिनीवाडी सर्कल ते मानपाडा जंक्शन प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे या वाहनांना पूर्वेकडील एकाच वाहिनीवरून पुढे जाणार आहेत. पातलीपाडा ब्रिज ते हिरानंदानी इस्टेटकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनास उत्तरेकडील वाहिनीवरून पातलीपाडा ब्रिज येथून प्रवेश बंद करीत ती वाहने दक्षिणेकडील एकाच वाहिनीवरून इच्छित स्थळी जातील. पातलीपाडा जंक्शन-मानपाडा जंक्शन-ब्रह्मांडनाका- गोल्डन डाइजनाका-कॅडबरीनाका-नितीन कंपनीनाका-तीनहातनाका (सर्व्हिस रोड) या स्पर्धेच्या मार्गावर सर्व वाहनांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. ही वाहने द्रुतगती व घोडबंदर महामार्गाने इच्छित स्थळी जातील. पारसिक सर्कलकडून कळवा नाक्याकडे येणाऱ्या वाहनास पारसिक सर्कल येथे बंदी घातल्याने ही वाहने हाय वे मार्गे मार्गक्रमण करणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईकडून कळवा चौकमार्गे ठाणे-सिडको बाजूस जाणाऱ्या एनएनएमटी व खाजगी बसेसना विटावानाका येथे नो एण्ट्री केल्याने या बसेस विटावानाका येथेच प्रवासी उतरवून परत जाणार, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली.
>ललिता बाबर प्रमुख आकर्षण; मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज
ठाणे : रविवारी होणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणेनगरी सज्ज झाली असून सकाळी ६.३० वा. महापालिका भवन येथून राज्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आॅलिम्पिकमध्ये रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारे दत्तू भोकनाळे तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कान्हा या मराठी चित्रपटासह बायोस्कोप, वायझेड या चित्रपटांचे कलावंत तसेच प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, नेहा राजपाल हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ठाणेकरांनीही स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर संजय मोरे यांनी केले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने यंदाही सर्व घटकांतील मंडळे, ज्ञातीबांधव, सेवाभावी संस्था सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महिला गटात आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, मोनिका अत्रे, स्वाती गवते, तर ज्योती चव्हाण, विनय भातूस या राष्ट्रीय धावपटू धावणार आहेत. तर, पुरुष गटात इलम सिंग, बहादूरसिंग धोनी, अनिल सिंग, बुद्दा बहादुर आदी राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. मुख्य स्पर्धेतील खेळाडूंना टायमिंग चीप देण्यात येणार असल्यामुळे स्पर्धेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
२१ किमी, १५ किमी व १८ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १२ वर्षांखालील मुलेमुली, ज्येष्ठ नागरिक, रन फॉर फन अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. २१ किमी व १५ किमी या मुख्य स्पर्धा सकाळी ६.३० वा सुरू होणार असून इतर स्पर्धा सकाळी ८.३० वा. सुरू होणार आहेत. संपूर्ण शहरात स्पर्धेची वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी यंदा पारसिकनगर ते ठाणे महापालिका अशी १० किमीची स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेची सुरुवात ही सकाळी ६.३० वा. होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १०.३० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धा मार्गावर स्पर्धकांसाठी पाण्याची व प्रथमोपचाराची सोय केली असून स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.