माहिती देण्यावरुन परिवहन विभागाची ‘चुप्पी’
By admin | Published: December 18, 2014 05:34 AM2014-12-18T05:34:12+5:302014-12-18T05:34:12+5:30
नवी दिल्लीत उबर या खाजगी टॅक्सी कंपनीच्या चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील खाजगी टॅक्सीं
मुंबई : नवी दिल्लीत उबर या खाजगी टॅक्सी कंपनीच्या चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील खाजगी टॅक्सींची तसेच चालकांची माहिती घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. एक आठवड्यापूर्वी फक्त पत्रकार परिषदेतून खाजगी टॅक्सींबाबत घेतलेल्या निर्णयाची माहीती दिल्यानंतर परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक ‘चुप्पी’ साधली.
नवी दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर राज्य परिवहन विभागाने मुंबईतील खाजगी टॅक्सीसंदर्भात काही निर्णय घेतले. ११ डिसेंबर रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत खाजगी टॅक्सींना चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील योजना सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. यात १२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत खाजगी टॅक्सी कंपन्यांना चालक आणि वाहकांची माहीती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तर ३१ डिसेंबरपर्यंत प्रवासी सुरक्षेसंदर्भातील योजना आणि १५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. या माहितीनंतर अॅप बेस खाजगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालण्याचा विचार असल्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचे समोर आले. विधानसभा अधिवेशनात याची घोषणा करण्यापूर्वीच परिवहन सचिवांकडून बंदीचे जाहिर करण्यात आल्याने परिवहन आयुक्तांकडून यापुढे कुठलेही विधान न करण्याच्या सूचना परिवहन विभागाला दिल्या. त्यानंतर विभागाकडून कुठलीच माहीती समोर येऊ देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)