परिवहन, शिक्षण समिती सेनेकडे

By admin | Published: April 3, 2017 04:29 AM2017-04-03T04:29:56+5:302017-04-03T04:29:56+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Transport, Education Committee | परिवहन, शिक्षण समिती सेनेकडे

परिवहन, शिक्षण समिती सेनेकडे

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. युतीतील वाटपानुसार शिक्षण समितीच्या सभापतीपदावर यंदा शिवसेनेचा हक्क आहे. त्यातच परिवहनचे सभापतीपददेखील सेनेकडेच जाण्याचे संकेत मिळत आहेत.
१३ सदस्यांच्या परिवहन समितीत शिवसेना ६, भाजपा ५ , काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी १ अशी सदस्य संख्या आहे. फेब्रुवारीअखेरीस शिवसेनेचे दोन आणि भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य असे सहा सदस्य निवृत्त झाले. यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मनोज चौधरी, संजय पावशे, मधुकर यशवंतराव हे शिवसेनेचे आणि भाजपाचे संजय राणे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी यांचा समावेश आहे. मागील सभापतीपद हे शिवसेनेकडे होते. त्यामुळे यंदा त्यावर भाजपाचा दावा आहे. परंतु महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपला दिल्याने परिवहनचे सभापतीपद शिवसेनेकडेच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याला शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी मात्र भाजपाची टर्म असल्याचे सांगत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. अर्ज दाखल करावयाच्या वेळेस याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
५ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता ही निवडणुक होणार असून त्यानंतर शिक्षण समिती सभापतीपदाची निवडणूकही पार पडणार आहे. (प्रतिनिधी)
जाधव-घोलप यांच्यात स्पर्धा
नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण समिती सदस्य निवडीत वैजयंती गुजर-घोलप, दया शेट्टी, वीणा जाधव, पुजा म्हात्रे, आशालता बाबर (सर्व शिवसेना), सुनिता खंडागळे, शैलजा भोईर, सचिन खेमा, निलेश म्हात्रे (सर्व भाजपा), प्रभाकर जाधव (मनसे) आणि नंदू म्हात्रे (काँग्रेस ) यांचा समावेश आहे. शिक्षण समितीत शिवसेनेचे बहुमत असून समितीवर पुन्हा संधी दिलेल्या घोलप यांना सभापतीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
परंतु सदस्य वीणा जाधव यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे जाधव आणि घोलप यांच्यात उमेदवारी मिळविण्यावरून स्पर्धा असल्याचे बोलले जाते. मागील वेळेसच घोलप यांना सभापतीपद दिले जाणार होते. मात्र निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना झालेल्या वाटाघाटीत समितीचे पहिले सभापतीपद भाजपाच्या वाट्याला गेल्याने त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे यंदा त्या सभापतीपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.

Web Title: Transport, Education Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.