बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध, कर्मचारी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 06:29 PM2017-10-20T18:29:43+5:302017-10-20T18:29:47+5:30
एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला.
बुलडाणा : एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला. विविध मागण्यांकरिता एसटी कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे.
प्रवाशांचे अतोनात हाल होत असले तरी शासनाने मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढसह विविध मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आपल्या मागण्यांची कोणत्याही प्रकारे शासन दखल घेत नसल्यामुळे शुक्रवारी बुलडाणा बस आगारातील कर्मचा-यांनी शासनाचा निषेध करण्याकरिता मुंडन केले. यावेळी बुलडाणा बस आगारातील अनेक कर्मचा-यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. बस स्थानक परिसरात कर्मचा-यांनी मुंडन केले. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
झुनका भाकर खाऊन केली दिवाळी साजरी
बुलडाणा आगारात 19 आॅक्टोबर रोजी आंदोलनकर्त्या कामगारांने झुनका भाकर खाऊन ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी केली. आंदोलन स्थळी कुठल्याही प्रकारची दिवाळी साजरी न करता झुनका भाकर खाऊन या शासनाचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ऐकीचे प्रदर्शन करीत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.