एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 05:18 PM2017-10-18T17:18:57+5:302017-10-18T17:24:47+5:30
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे.
मुंबई - सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात पोहोचले आहेत. बैठकीसाठी दुपारी 2 वाजताची वेळ दिल्यानंतर रावते पाच वाजता मुख्यालयात पोहोचले.
लवकरच एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनांसोबत बैठक सुरु होणार आहे. एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे राज्यभरात प्रवाशांचे हाल होत आहेत. ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणा-या आठ विभागातील एसटी डेपोमध्ये शुकशुकाट दिसत येत असताना, दुपारपर्यंत या विभागातून अवघ्या १३ गाड्या सुटल्या. त्यामुळे एसटीचे दिवसभराचे जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत ठाणे शहरातील दोन विभाग, भिवंडी, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी अशा आठ विभाग येतात. त्या आठ विभागातून दिवसभरात ठाणे जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात (लांब पल्ल्याच्या) सुमारे २,८०० गाड्यांच्या फे-या नियोजित आहेत. परंतु, मंगळवारी दुपारपर्यंत होणा-या १,३८३ फे-यांपैकी अवघ्या १३ गाड्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक ११ गाड्या या शहापूर येथून सुटल्या असून ठाणे, खोपट आणि विठ्ठलवाडी डेपोतून प्रत्येकी एक गाडी सुटली होती.
३८ हजार कामगार सहभागी
विभागीय नियंत्रण कार्यालयात असलेल्या ८ विभागात सुमारे ३८ हजार ९८ अधिकारी-कर्मचारी हजेरी पटलावर आहेत. जवळपास ३८ हजार कामगार संपात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
वाहक असलेले वाकचौरे यांची एस.टी. महामंडळात २२ वर्षे सेवा झाली आहे. सकाळपासूनच ते आंदोलनात बसून होते. दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नोकरी जाईल, याचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. बसस्थानकावजळील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या संपाविषयी सरकार उदासीन असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. दरम्यान एस.टी. संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून कर्मचारीही बसस्थानकात आंदोलन करीत आहेत.