"आम्ही काय भीक मागत नाही, आमचा अधिकार मागतोय"; प्रताप सरनाईकांनी अर्थखात्याला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:04 IST2025-04-11T15:59:07+5:302025-04-11T16:04:22+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त खात्याला चांगलेच सुनावले आहे.

"आम्ही काय भीक मागत नाही, आमचा अधिकार मागतोय"; प्रताप सरनाईकांनी अर्थखात्याला सुनावलं
Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराची केवळ ५६ टक्केच पगाराची रक्कम मिळाल्याने संतापाची लाट उसलळी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित ४४ टक्के रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. आता या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. आम्ही अर्थ खात्याकडे ९२८ कोटी रुपये मागितले होते पण आम्हाला केवळ २७२ कोटी रुपये देण्यात आल्याचे परिवहन मंत्री म्हणाले. अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाही ही शोकांतिका असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
"एसटी कर्मचारी तुटपुंज्या पगारातून आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना वेळेवर पगार मिळत नाही ही वास्तविकता त्यांना मिळालेल्या ५६ टक्के पगारामुळे उघडकीस आली. त्यानंतर मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वित्त खात्याच्या प्रधानांशी चर्चा करून मंगळवारपर्यंत पगार देण्याचे कबूल केले आहे. पण हा निर्णय या महिन्यासाठी झाला. सातत्याने असे प्रश्न निर्माण होत असतील तर हे योग्य नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वेळेवर पगार दिला जातो तशाच प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार मिळायला हवा आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आणि आमचा अधिकार मागत आहोत आणि तो जर मिळत नसेल तर अयोग्य आहे," अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
"यापूर्वीही मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आम्ही जी मागणी करतोय ती वाढीव नाही, जे आमचे आहे तेच आम्हाला द्या अशी मागणी होती. आमच्या विभागाकडून गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर आमच्या विभागाकडे परत पाठवली जाते. ती फाईल वित्त खात्याच्या मंत्र्यांकडेसुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका आहे," असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
"ही वस्तुस्थिती आहे की ९२८ कोटी रुपयांची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेली असताना फक्त २७२ कोटी आम्हाला मिळत असतील तर एसटी कामगारांचा पगार आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही. मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की एसटी कामगारांचे पगार वेळेत झाली पाहिजेत," असेही प्रताप सरनाईक म्हणाले.