रामबाग पुलावरील वाहतूक सुरूच
By admin | Published: August 8, 2016 01:27 AM2016-08-08T01:27:57+5:302016-08-08T01:27:57+5:30
भोर तालुक्यातील नीरानदीवरील ब्रिटिशकालीन राणीलक्ष्मीबाई पूल धोकादायक असल्याचे कारण देत वाहतूक बंद करण्यात आली आहे
भोर : भोर तालुक्यातील नीरानदीवरील ब्रिटिशकालीन राणीलक्ष्मीबाई पूल धोकादायक असल्याचे कारण देत वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोर-पुणे रोडवरील कासुर्डी गु.मा येथील गुंजवणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १०१ वर्षे, तर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नीरानदीवरील सारोळा येथील पुलाला ५८ वर्षे, तर महाड-पंढरपूर रोडवरील रामबाग ओढ्यावरील पुलाला १३१ वर्षे पूर्ण झालेल्या या सर्व ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूकसुरू आहे.
मग या पुलाला धोका निर्माण होऊ शकत नाही का? भोरचा नीरानदीवरील पूल बंद केला आहे. मग वरील तीनही जिल्हा, राष्ट्रीय, राज्यमार्गावरील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरील वाहतूक बंद होणार का?
महाड दुर्घटनेनंतर शासनाला जाग आली आणि राज्यातील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यात भोर तालुक्यातील नीरानदीवरील १९३३ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या सुमारे ८३ वर्षांच्या राणी लक्ष्मीबाई पुलावरील वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन पुलाचे काम करून त्यावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव धाडवे यांनी केली आहे.