मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी
By Admin | Published: September 23, 2015 01:39 AM2015-09-23T01:39:47+5:302015-09-23T01:39:47+5:30
गणेशोत्सवासाठी गावी गेलेले चाकरमानी पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देऊन परतीच्या प्रवासाला निघाले आहेत
महाड : गणेशोत्सवासाठी गावी गेलेले चाकरमानी पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देऊन परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. या परतीच्या प्रवासाला मुंबईकडे निघालेले चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी सकाळपासून झालेल्या ट्राफिक जॅममुळे अक्षरश: हैराण झाले. टेमपाले ते माणगांवदरम्यान वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले. तर महाड ते माणगांवपर्यंतच्या अंतरासाठी वाहनांचा तीन ते चार तास खोळंबा झाला.
गणेशोत्सवामुळे मुंबई, ठाणे परिसरातून आपल्या गावी कोकणात गेलेले चाकरमानी परतायला सुरुवात झाली. मंगळवारी महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या. मोठ्या अवजड वाहनांना या मार्गावर गणेशोत्सव काळात बंदी असली तरी खाजगी बसेस तसेच एसटी बसेसच्या वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूककोंडी होत होती. माणगावपासून सुरू झालेल्या वाहतूककोंडीचा फटका सर्वाधिक खाजगी वाहनांना बसला. एक एक तास वाहनांना जागेवरच थांबावे लागल्यामुळे मुुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. या वाहतूककोंडीमुळे खोळंबा झालेल्या वाहनांची रांगा वीर रेल्वे स्थानकापर्यंत होती. नियमित होणाऱ्या या वाहतूककोंडीवर उपाययोजना होत नसल्याने चाकरमान्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)