निवडणुक प्रशासनच करणार मतदारांच्या वाहतुकीची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 09:20 PM2019-03-19T21:20:57+5:302019-03-19T21:24:40+5:30
ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांनी मागणी केल्यास संबंधित निवडणूक प्रशासनाच अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने विविध उपाय-योजना करण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांनी मागणी केल्यास संबंधित निवडणूक प्रशासनाच अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भांत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिका-यांना जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. याशिवाय अपंग मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक किंवा दोन व्हीलचेअर देखील ठेवण्यात येणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागात विविध पक्षांकडूनच जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाते. परंतु मतदारांची अशी वाहतुक करणे हा एक प्रकारे संंबंधित उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार समजला जातो. यामुळेच यावेळी निवडणूक आयोगानचे अशा प्रकारे संबंधित उमेदवार अथवा पक्षांकडून करण्यात येणा-या मतदारांच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. परंतु जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विविध पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच ज्येष्ठ नागरिक आणि अंपग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच संबंधित निवडणूक प्रशासनच नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. याबाबत मतदान केंद्रा पर्यंत येण्यासाठी काही अडचण असल्यास संबंधित मतदारांनी जिल्हा प्रशासनाकडून विकसित करण्यात आलेल्या अॅप च्या माध्यमातून वाहन व्यवस्थेची मागणी करावी लागणार आहे. मतदानाच्या किमान एक दिवस ही मागणी नोंदविता येणार आहे. त्यानंतर संबंधित निवडणूक प्रशासन वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
--
ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांची खास काळजी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांची खास काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रवार अपंग व्यक्तींसा रॅम्प आणि एक ते दोन व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ मतदार, अपंग व्यक्ती किंवा आजारी व काही अडचण असणा-या मतदारांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या अॅपच्या माध्यमातून वाहन व्यवस्थेची मागणी केल्यास आम्ही ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हडपसर विधानसभा मतदार संघात काही मतदान केंद्रावर किमान एक रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर मागणी येईल त्यानुसार मतदारांना आणण्यासाठी रिक्षा पाठविण्यात येईल.
-भारत वाघमारे, हडपसर विधानसभा मतदार संघ निवडणूक अधिकारी