सानपाडा स्थानकाबाहेर कचऱ्याचा ढीग
By admin | Published: July 22, 2016 01:57 AM2016-07-22T01:57:03+5:302016-07-22T01:57:03+5:30
महानगरपालिकच्या वतीने कचऱ्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिकच्या वतीने कचऱ्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचरा वर्गीकरणाविषयी नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात असून काही परिसरात अजूनही ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. पावसामुळे हा कचरा पूर्णपणे भिजला असून या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
ओला आणि सुका कचऱ्यासाठी या ठिकाणी वेगळी कचराकुंडी नसल्याने एकाच कचराकुंडीत कचरा टाकला जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरातील कचरा न उचलल्याने कचराकुंडीबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. सध्या पावसामुळे साथीचे आजारही बळावले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.