ट्रॅव्हल एजन्सी मालकाला अटक
By admin | Published: June 28, 2017 03:39 AM2017-06-28T03:39:46+5:302017-06-28T03:39:46+5:30
हेलिकॉप्टरने अमरनाथ दर्शनासाठी नेण्याचे आमिष दाखवून ५१ भाविकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हेलिकॉप्टरने अमरनाथ दर्शनासाठी नेण्याचे आमिष दाखवून ५१ भाविकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दिव्या ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक भूपेश सुरती याला सोमवारी अटक केली आहे.
सुरतीने २५ जून, २०१७ रोजी जाहिरात दिली होती. ज्यात प्रवाशांना हेलिकॉप्टरने फिरवण्याचे आमिष दाखविण्यात आले. तसेच रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना आकर्षक बक्षीस देण्याचेही म्हटले होते. या जाहिरातीला हे ५१ प्रवासी फसले. ज्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकी १९ ते २० हजार रुपये वसूल केले. त्यात वातानुकूलित रेल्वे प्रवास, राहणे, खाणे आणि हेलिकॉप्टरने फिरणे या सुविधा दिल्या जातील, असे त्याने सांगितले. अशा प्रकारे २० लाखांहून अधिक रुपयांचा गंडा त्याने घातला आहे. या प्रकरणी कांदिवलीतील संजीव चतुर्वेदी (५०) यांनी तक्रार दाखल केली. त्यांनीदेखील सुरतीकडे ट्रिप बुक केली. ज्यात घरातील सहा जणांचे ७९ हजार ५०० रुपये त्यांनी दिले होते. सुरतीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले, तेव्हा त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.