मुंंबई मेट्रोचा प्रवास दिल्ली, बंगळुरूपेक्षा महाग
By admin | Published: February 9, 2015 05:47 AM2015-02-09T05:47:27+5:302015-02-09T05:47:27+5:30
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे
सचिन लुंगसे, मुंबई
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे मुंबई मेट्रोलाही अनुदान मिळाले अथवा करात सवलत मिळाली तर मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आणि मुंबई मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० अशा टप्प्यात वाढले. मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोशी तुलना केली असता दिल्ली मेट्रोच्या १२ किलोमीटरच्या प्रवासाठी ८ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत. आणि बंगळुरू मेट्रोच्या ६ किलो मीटर प्रवासासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. आणि मुंबई मेट्रोचा प्रवास उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर १०, २०, ३०, ४० असा झाला आहे.
मुळात दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोसाठी एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही. शिवाय त्यांना अनेक कर भरावे लागत नाहीत, कस्टम ड्युटी द्यावी लागत नाही किंवा त्यात त्यांना सवलत मिळते. शिवाय दिल्ली आणि बंगळुरू मेट्रो, जी वीज वापरते त्याला अनुदान मिळते. अशा अनेक घटकांमुळे दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोचे प्रवास भाडे नियंत्रणात राहते. परंतु मुंबई मेट्रोला यापैकी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. मुंबई मेट्रोला १३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर दिल्ली मेट्रोला १.५ व्याजदराने कर्ज मिळते. मुंबई मेट्रोसाठी जी वीज वापरली जाते, त्यासाठी १ युनिटकरिता ११ रुपये मोजावे लागतात. दिल्ली मेट्रो १ युनिटसाठी ६ रुपये मोजते. मुंबई मेट्रोला एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी आणि उर्वरित करदेखील माफ नाहीत, विजेवर अनुदान नाही. परिणामी मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलती मिळूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षांत दिल्ली मेट्रोला १०० कोटींचा तोटा झाला होता. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाढीच्या मंजुरीआधी मुंबई मेट्रोला दिवसागणिक ८० लाखांचा तोटा होत होता आणि आजही तो आकडा तेवढ्याच घरात आहे. परिणामी मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुर मेट्रोशी तुलना करताना मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे कमी होणे गरजेचे असेल, तर मुंबई मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विजेच्या वापरावर अनुदान मिळाले पाहिजे आणि उर्वरित करातही सवलत मिळाली पाहिजे. राज्य अथवा केंद्र सरकारने दरवाढीचा गोंधळ घालताना वरील मुद्दे लक्षात घेतले तर साहजिकच मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळेल.(प्रतिनिधी)