दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 07:01 AM2019-12-24T07:01:25+5:302019-12-24T07:01:45+5:30

५१४३ जणांचा मृत्यू : ३५,७१७ अपघातांपैकी साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे

Traveling on a bike is fatal | दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

Next

मुंबई : राज्यात दुचाकींची संख्या जास्त असून दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. २०१८ मध्ये घडलेल्या एकूण ३५,७१७ अपघातांपैकी दुचाकीचे सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात झाले, त्यामध्ये १३,२६१ जणांना जीवास मुकावे लागले. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे झाले, तर सर्वात कमी ई-रिक्षाचे दोनच अपघात घडले असून, यात एकाचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या २०१८च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी दुचाकीचे एकूण १३,७३२ अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला असून, ७,२७८ जण गंभीर जखमी, तर ३,८२५ जण किरकोळ जखमी झाले. घडलेल्या एकूण अपघातांमध्ये दुचाकीनंतर कार, जीप, व्हॅन, टॅक्सी या चारचाकी वाहनांचा नंबर लागतो. या वाहनांचे एकूण ७,५९१ अपघात घडले. यात २,४५० जणांना जीवास मुकावे लागले. ४,९०२ गंभीर जखमी झाले, तर २,४६८ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत ट्रक, लॉरीचे ३,९२५ अपघात होऊन १,७१९ जणांचा मृत्यू झाला. बसचे १,६८९ अपघात होऊन ६२३ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहने, ट्रॉलीचे १,३७८ अपघात घडले. यात ६३६ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ गंभीर जखमी आणि ३२० किरकोळ जखमी झाले.

ई-रिक्षा सुरक्षित
महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ई-रिक्षाचे केवळ दोनच अपघात घडले असून यात एकाचा मृत्यू झाला. तर, सायकलचे ४१३ अपघात होऊन यात १२५ ठार, २२६ गंभीर, तसेच १४२ किरकोळ जखमी झाले. इतर १,९६५ अपघातांमध्ये ९१४ जणांना जीव गमवावा लागला असून, यात ९८६ गंभीर, तर ४५८ किरकोळ जखमी झाले.

Web Title: Traveling on a bike is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.