काश्मीर खोऱ्यात यात्रेकरुंचा दिवसा प्रवासही धोकादायक
By admin | Published: July 19, 2016 03:00 AM2016-07-19T03:00:19+5:302016-07-19T03:00:19+5:30
काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाईत सामील असलेला दहशतवादी बुऱ्हान वानी याला चकमकीत ठार केल्यावर खोऱ्यात अस्वस्थता पसरली
पंकज पाटील,
अंबरनाथ- काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाईत सामील असलेला दहशतवादी बुऱ्हान वानी याला चकमकीत ठार केल्यावर खोऱ्यात अस्वस्थता पसरली. वानीच्या समर्थनासाठी खोऱ्यातील तरुणांचे जत्थे रस्त्यावर उतरले आणि वातावरण तंग झाले. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले भागही गेल्या आठवड्यापासून शांत झाले. त्यातच अमरनाथची यात्रा सुरु झाल्याने पर्यटकांसोबतच यात्रेकरूंनाही सुरक्षेच्या कारणास्तव रोखून धरण्यात आले. ज्या काश्मिरात रात्रीच्या वेळी प्रवास धोक्याचा मानला जाई, तेथे आता दिवसा फिरणेही धोकादायक बनले, तर रात्रीचा प्रवास सुरक्षित करण्यात आला. या वातावरणाचा थेट फटका काश्मीरच्या पर्यटनाला आणि अमरनाथ यात्रेला बसला.
अमरनाथ यात्रा २ जुलैला सुरु झाली. या यात्रेची नोंदणी चार महिने आधीच यात्रेकरुंनी केलेली होती. त्यामुळे यात्रेकरुंच्या दर्शनाचा दिवस निश्चित होता. त्यानुसार यात्रेकरुंची तयारी होती. यात्रेला आठवडा उलटत नाही तोच ९ जुलैपासून काश्मीर तंग झाले. दहशतवाद्याचा खात्मा केल्याने नागरिकांनी पोलीस आणि सुरक्षा दलांविरोधात राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. संपूर्ण काश्मिरात त्याचे पडसाद उमटल्याने त्याचा थेट फटका हा अमरनाथ यात्रेला बसला. काश्मीर पेटलेले असल्याने पर्यटकांनी तेथे येणे टाळले. मात्र अमरनाथ यात्रेकरूंनी कोणत्याही दहशतीला न घाबरता यात्रा सुरूच ठेवण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे यात्रेकरू मिळेल त्या मार्गाने पहेलगाम आणि बालटालपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होते, तर जम्मू येथून येणाऱ्या यात्रेकरुंचा कारवाँ जम्मू-काश्मीर महामार्गावरच रोखण्यात आला होता. वातावरणाचा अंदाज घेतल्यावर सुरक्षा दलाचे जवान यात्रेकरुंना बालटाल पर्यंत सोडत होते.
विमानाने येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या मोठी असल्याने या यात्रेकरुंचे काय करावे हा प्रश्न सुरक्षा दलांपुढे होता. भोलेबाबांचे दर्शन घेण्याच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे अनेक यात्रेकरुंनी विमानतळावर तळ ठोकला. श्रीनगर विमानतळावर पोचलेल्या पर्यटकांनी टॅक्सी स्टँडवर चौकशी केल्यावर त्यांना मिळणारे उत्तर आश्चर्यकारक तर होतेच, पण काश्मिरातील बदलत्या स्थितीची चुणूक दाखवणारे होते. ‘बालटाल तक जाओगे क्या?’ या प्रश्रावर टॅक्सीचालक म्हणत, ‘आप कहाँसे आये हो, आपको कुछ समझ आ रहा है क्या, यात्रा-वात्रा कुछ नहीं होगी, जैसे आये हो वैसे हमारे देश से निकलकर जाओ. वरना जान से हात धो बैठोगे.’ टॅक्सीचालकांच्या या पवित्र्यामुळे सर्वसामान्य यात्रेकरुही भेदरलेल्या अवस्थेत पुन्हा माघारी फिरण्याचा विचार करत. श्रीनगर टॅक्सी स्टँडवर टॅक्सीचालकांचा एक गट यात्रेकरुंना यात्रा करू न देण्याचा प्रयत्न करत आहे. या अपप्रवृतींविरोधातही काही टॅक्सीचालक आहेत. यात्रेकरुंना त्रास न देता त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ‘‘आप बालटाल तक नहीं जा सकोगे, मगर आपको श्रीनगरके दल लेक के हॉटेल में रहनेकी सुविधा देता हूँ, हालात ठिक होते ही आपको बालटाल तक पहुँचाने का प्रयास करेंगे’, अशा सूचना करणाऱ्या टॅक्सीचालकांमुळे यात्रेकरुंना आपण सुरक्षित राहू शकतो, असा किंचितसा का होईना विश्वास वाटत होता. श्रीनगरहून थेट बालटाल किंवा पेहलगामपर्यंत पोचणे शक्य नसल्याने अनेक यात्रेकरुन हे श्रीनगरच्या दल लेकवर असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम करत. दिवसभर वातावरण तंग असल्याने आणि संपूर्ण काश्मीर खोऱ्यात जमावबंदी असल्याने येथील सर्व रस्ते मोकळे दिसत. दल लेकवर पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसते. मात्र या वातावरणात रस्त्यावर एकही वाहन दिसत नाहीत. हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले यात्रेकरु हॉटेलच्या बाहेर पडण्यासही घाबरत. या तणावपूर्ण वातावरणात यात्रेच्या ठिकाणी जाणार कसे, हा प्रश्न सर्वांनाच पडायचा. अमरनाथ यात्रा जास्त दिवस बंद केल्यास यात्रेकरु काश्मिरात अडकून पडतील, या भीतीने सरकारने पुढाकार घेत या यात्रेकरुंना बालटाल आणि पेहलगामपर्यंत पोचविण्याची चोख व्यवस्था केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सुरक्षा दलांना आलेल्या आदेशानंतर यात्रेचा प्रारंभ होणाऱ्या ठिकाणापर्यंत यात्रेकरुंना पोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज होत्या. सुरक्षा दलाच्या गाड्यांच्या ताफ्याच्या मागे यात्रेकरुंच्या गाड्यांचा कारवाँ सोडण्यात येतो. रात्री १२ नंतर रस्ते खुले होत असल्याने रात्री रस्त्यावर कोणी नागरिक येणार नाही, याची काळजी सुरक्षा बलामार्फत घेतली जाते. तसेच गाड्यांवर कोणताही हल्ला होऊ नये यासाठी श्रीनगर ते बालटाल या ८३ किमीच्या रस्त्यावर प्रत्येक ५० मीटरवर एक सुरक्षा दलाचा जवान तैनात होता. एवढेच नव्हे, तर एका सुरक्षा दलाच्या एका जवानाला दुसरा जवान दिसेल एवढ्या कमी अंतरावर हे जवान तैनात असल्याने दंगल मागविणाऱ्यांना गाड्यांवर हल्ला करण्यास वाव दिला जात नाही. प्रत्येक किलोमीटरवर सुरक्षा दलाचा तंबू ठोकण्यात आला आहे. तेथून निघालेल्या गाड्यांची संख्या पुढच्या चेकपोस्टला दिली जाते. त्यामुळे रस्त्याच मध्यभागी कोणतेही वाहन भरकटणार नाही, याची काळजी घेतली जाते. एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास ती गाडी बाजुला घेण्याची वेळ आल्यास जवळच असलेला सुरक्षा दलाचा जवान तत्काळ त्या गाडीजवळ जाऊन तिच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारतो. यात्रेकरूंवर हल्ला होणार नाही, याची डोळ््यात तेल घालून काळजी घेत त्यांंना बालटालपर्यंत पोचवण्यात येते. बालटालला आलेल्या यात्रेकरुंना राहण्यासाठी तंबू उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता यात्रेकरुंना अमरनाथ बाबांच्या गुंफेचा मार्ग खुला करण्यात येतो. (क्रमश:)
अमरनाथ यात्रा ही दोन ठिकाणाहुन सुरू होते. त्यातील जवळचा मार्ग म्हणजे बालटाल, तर दुसरा मार्ग हा पेहलगामवरुन सुरु होतो. पेहलगामहून यात्रेकरुंना बाबांच्या गुंफेपर्यंत येण्यास दोन दिवस लागतात. त्यामुळे या यात्रेकरुंना एक दिवस वस्ती करणे भाग पडते, तर बालटालहून प्रवास करणाऱ्या यात्रेकरुंना अत्यंत धोकादायक रस्ता ओलांडत गुंफेपर्यंत पोचता येते. हा मार्ग अत्यंत धोकादायक असला तरी चार ते सहा तासात यात्रेकरु गुंफेपर्यंत पोचू शकतात. तसेच दर्शन घेऊन लगेच निघाल्यास सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पर्यटक पुन्हा बालटालला माघारी पोचू शकतात.ज्या पर्यटकांना धोकादायक मार्ग ओलांडण्याची हिम्मत होत नाही, अशा पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे. बालटाल आणि पेहलगामवरुन ही हेलिकॉप्टर सेवा सुरु आहे. मात्र हेलिकॉप्टर थेट बाबांच्या गुंफेपर्यंत न जाता सहा किमी आधी म्हणजे पंचतरणीपर्यंतच जाते. पंचतरणीपर्यंत हेलिकॉप्टरने आल्यावर पर्यटकांना पुन्हा सहा किमी अवघड रस्त्याची चढाई करत गुंफेपर्यंत जावे लागते. हा प्रवास पायी किंवा खेचराच्या साह्याने करता येतो.