Blog: निसर्ग, बोगदे, ब्रीज हे सगळं दर्जेदार; पण कोकण रेल्वे वेळ पाळायला कधी शिकणार?

By देवेश फडके | Published: July 23, 2024 12:23 PM2024-07-23T12:23:35+5:302024-07-23T12:29:04+5:30

Konkan Railway: पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे पर्वणीच. परंतु, अनेक कारणांमुळे या प्रवासात प्रवाशांच्या मनस्तापात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

travelling konkan railway like heaven in monsoon but passenger face many problems including delayed train and irregularity in management | Blog: निसर्ग, बोगदे, ब्रीज हे सगळं दर्जेदार; पण कोकण रेल्वे वेळ पाळायला कधी शिकणार?

Blog: निसर्ग, बोगदे, ब्रीज हे सगळं दर्जेदार; पण कोकण रेल्वे वेळ पाळायला कधी शिकणार?

Konkan Railway: कोकण रेल्वेभारतीय रेल्वेला लाभलेला एक हिरा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, तसेच कोकण रेल्वेचा जन्म, इतिहास, आजपर्यंतची खडतर वाटचाल यालाही विविध पैलू आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारी वाट, घाटांच्या वळणाप्रमाणे बदलत जाणारी निसर्गाची रुपे, धीरगंभीर, प्रसंगी भीतीदायक बोगदे, प्राण रोखायला लावणारे मोठे पूल आणि निसर्गाच्या अपरिमित सौंदर्याचा आस्वाद घेत प्रवासाचा कंटाळा न येऊ देणारी ही कोकण रेल्वेची वाट आहे. पावसाळ्यात तर हा मार्ग म्हणजे प्रवासी, पर्यटकांसाठी पर्वणीच. धबधबे, हिरवेगार डोंगर, ऊन-सावलीचा खेळ ही सारीच प्रवाशांना भुलवणारी कोकण रेल्वेची बलस्थाने. परंतु, भीक नको पण कुत्रं आवर, या म्हणीचा पुरेपूर अनुभव कोकण रेल्वेवर प्रवास करणारे प्रवासी आणि गावी जाणारे चाकरमानी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकीकडे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे म्हटले तर घडाळ्याच्या काट्यावर असणारी धावपळ दिसू लागते. तर दुसरीकडे कोकण रेल्वेचे सातत्याने कोलमडणारे वेळापत्रक प्रवाशांच्या मनाची धाकधूक वाढवते, असेच चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तसे पाहायला गेल्यास अगदी वंदे भारत ट्रेनपासून ते कोकणकन्या एक्स्प्रेसपर्यंत कोकण रेल्वेवर पॅसेंजर ट्रेनपासून ते हायक्लास, हायस्पीड ट्रेनपर्यंतची जंत्री आहे. परंतु, या अनुभवाला ट्रेनचे कोलमडणारे वेळापत्रक जेव्हा छेद देते, तेव्हा मनस्तापाशिवाय हातात काही उरत नाही. अतिशय खडतर परिस्थितीतून कोकण रेल्वेची निर्मिती झाली, याचे गोडवे अनेकदा गायले जातात. त्या काळात हा रेल्वे मार्ग निर्माण करणाऱ्यांना मानचा मुजराच. परंतु, भूतकाळात अधिक रममाण न होता वास्तविकतेचा विचार आता कोकण रेल्वेने करायला हवा, असे प्रकर्षाने जाणवते. 

कोकण रेल्वेचा ७४० किमी लांबीचा हा मार्ग रोहा, रत्‍नागिरी, कुडाळ, मडगाव असे करत पुढे खाली दक्षिणेत जातो. कोकण आणि गोव्यातील पर्यटकांना कोकण रेल्वे हाच एक उत्तम पर्याय आहे. याची अनेक कारणे वेळोवेळी अधोरेखित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनची संख्या वाढवली जाते. मात्र, मान्सून टाइमटेबल, एकच मार्गिका, हायस्पीड, सुपरफास्ट ट्रेनना देण्यात येणारे प्राधान्य यांमुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील कामे, त्यानंतर आता लोकमान्य टिळक टर्मिनसवर घेण्यात आलेली कामे यांमुळे नियोजित स्थानकावर ट्रेन पोहोचण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात काही अपवाद वगळता कोकण रेल्वेवरील बहुतांश ट्रेन अनेक तास उशिराने धावण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे आणि ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. 

अलीकडेच आधी पेडणे बोगद्यात गळती होऊन बरेच पाणी साचले होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या सेवांना मोठा फटका बसला होता. अनेक सेवा रद्द कराव्या लागल्या होत्या. यातून कोकण रेल्वे आणि प्रवासी सावरत असताना दिवाण खवटी-खेट या दरम्यान बोगद्याजवळ एक दरड कोसळली. पुन्हा एकदा कोकण रेल्वेची सेवा ठप्प झाली. तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ कोकण रेल्वेची सेवा बाधित झाली होती. अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या होत्या. तर काही सेवांचे मार्ग बदलण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे लोकमान्य टिळक टर्मिनसमधील कामांमुळे नेत्रावती आणि मत्स्यगंधा या ट्रेन पनवेलपर्यंत चालवल्या जाणार आहेत. म्हणजेच या ट्रेनची सेवा पुढे ठाणे आणि एलटीटीपर्यंत येणार नाही. ज्या प्रवाशांनी आधीच तिकिटे काढलेली आहेत. जे प्रवासी वसई-विरार, कल्याण-बदलापूर, टिटवाळा यांसारख्या ठिकाणांहून या ट्रेन पकडण्यासाठी येणार आहेत किंवा त्या ठिकाणी प्रवाशांना जायचे आहे, अशा प्रवाशांचे होणारे हाल कोकण रेल्वेने लक्षात घेतले का, असा प्रश्न उपस्थित होतो. हीच परिस्थिती कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसची आहे.

कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसने तर विलंब होण्याचे सर्व रेकॉर्ड गेल्या काही दिवसांत मोडल्याचे पाहायला मिळत आहे. जेवढा वेळ मुंबई ते मडगाव हे अंतर पार करायला लागतो, तेवढे तास या ट्रेन विलंबाने धावल्या. मडगावहून सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ही ट्रेन सकाळी मुंबईत पोहोचल्यावर तीच ट्रेन पुढे मांडवी म्हणून परत मडगावला जाते. जून महिन्यात तर मांडवी एक्स्प्रेस ही अनेकदा उशिरा धावली. मुंबईतून सरासरी उशिरा सुटण्याची वेळ किमान २ तास ते ५ तास होती. तर, मडगावला सरासरी उशिरा पोहोचण्याची वेळ ५ ते ८ तास होती. हीच गत रात्री सुटणाऱ्या कोकणकन्या ट्रेनबाबतही होते. कारण, सकाळी मडगावहून सुटलेली मांडवी एक्स्प्रेस रात्री मुंबईला पोहोचल्यानंतर तीच ट्रेन परत कोकणकन्या म्हणून मडगावसाठी रवाना होते. याचे निव्वळ कारणे म्हणजे, एकाच मार्गिकेमुळे ट्रेन सायडिंगला काढणे, सुटीकालीन सिझनमुळे वाढवलेल्या ट्रेन, हायस्पीड, सुपरफास्ट ट्रेनला दिलेले प्राधान्य हीच आहेत. कळीचा मुद्दा म्हणजे कोकणकन्या एक्स्प्रेसला सुपरफास्ट ट्रेनचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या ट्रेनचे तिकीट काही प्रमाणात वाढले. परंतु, वेग आणि मर्यादा त्याच राहिल्या. यातून रेल्वेची कमाई वाढली असली तरी प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी झालेला नाही.

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेससह अन्य ट्रेनला विलंब होणे ही नित्याची बाब झाली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात अनेकदा प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पाना न देता जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस या ट्रेन दादर स्थानकावरच टर्मिनेट करण्यात आल्या. म्हणजेच या ट्रेन पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचल्याच नाहीत. यामुळेही अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. उन्हाळी सुट्टी, मान्सून काळ, गणपती, दिवाळी, नववर्ष, होळी या वेळेस तर कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणे ही अगदी सामान्य बाब झाली आहे. प्रवाशांच्याही ते काही प्रमाणात अंगवळणी पडले आहे. कोकण रेल्वेच्या ट्रेन्स इतक्या लेट असतात की त्या वेळेवर आल्या तरच लोकांना आश्चर्य वाटते. 

कोकण रेल्वेवर सध्या ५२ एक्सप्रेस आणि १८ मालगाड्या धावत आहेत. काही वर्षांपूर्वी रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान ५० किमीचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या एकूण मार्गात ९१ बोगदे आहेत. सर्वांत मोठा बोगदा रत्नागिरीतील करबुडे येथे आहे. याची लांबी साडे सहा किमी आहे. तर १७९ मोठे पुल आहेत तर ८७९ छोटे पुल बांधले आहेत. या मार्ग संपूर्ण एकेरी आहे. त्यामुळे अनेकदा सुपरफास्ट ट्रेनला जागा देण्यासाठी चाकरमान्यांच्या ट्रेन सायडिंगला टाकल्या जातात. यावर उपाय म्हणून जिथे बोगदे, मोठे पूल नाहीत, अशा ठिकाणी दुपदरीकरण करण्याचा विचार कोकण रेल्वेचा आहे. म्हणूनच कोकण रेल्वेच्या मार्गावर पॅचेसच्या स्वरूपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा ३५० किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.  

वास्तविक, कोकण रेल्वेने याबाबत खूप आधीच विचार करणे अपेक्षित होते. असे केल्यास संपूर्ण मार्गाचे नियोजन करण्यापेक्षा काही ठिकाणचे नियोजन कोकण रेल्वेला करावे लागेल. ही योजना प्रत्यक्षात आल्यास ट्रेनची संख्या आणि मार्गाची क्षमता वाढू शकेल. ट्रेन सायडिंगला काढण्याचे प्रमाण कमी होईल. तुलनेने वेळात्रकानुसार ट्रेन चालवणे काही प्रमाणात शक्य होईल. मान्सून काळात अपघात होऊ नये, अडचण येऊ नये, समस्या आलीच तर तत्काळ दूर करता यावी, यासाठी कोकण रेल्वेकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जातात. अनेक बाबतीत कोकण रेल्वेचे कौतुक करायलाच हवे. परंतु, काळाची गरज ओळखून आता शक्य तितक्या लवकर शक्य आहे तिथे दुपदरीकरण करून प्रवाशांना दिलासा देणे, हेच काम कोकण रेल्वेन करायला हवे.

जाता जाता, कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर धुरांच्या रेषा हवेत काढणारी ट्रेन आता दिसत नाही. गेल्या १० वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेचा विकास, स्तर नक्कीच अनेकपटीने वाढला आहे. पावसाळ्यात कोकणातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुद्दाम प्रवासी, पर्यटक कोकण रेल्वेचा पर्याय स्वीकारतात. काळाची पावले ओळखत कोकण रेल्वेने मन मोठे केले पाहिजे आणि प्रवासी, पर्यटक यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, हीच साधी अपेक्षा...

- देवेश फडके.
 

Web Title: travelling konkan railway like heaven in monsoon but passenger face many problems including delayed train and irregularity in management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.