वस्त्रसंस्कृतीचा खजिना उलगडणार
By Admin | Published: June 9, 2017 02:06 AM2017-06-09T02:06:48+5:302017-06-09T02:06:48+5:30
गुगलच्या साहाय्याने डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची पोशाख संस्कृती आॅनलाइन म्युझियमद्वारे खुली करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुगलच्या साहाय्याने डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची पोशाख संस्कृती आॅनलाइन म्युझियमद्वारे खुली करण्यात आली आहे. जगभरातील वस्त्रोद्योगाच्या ३ हजार वर्षांतील पोशाख आणि शैली यांचे आभासी दर्शन दाखवले जाणार आहे. गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चरद्वारे ‘हम परिधान संस्कृती’ प्रकल्प डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयासह जगभरात १८० संग्रहालयांत कार्यरत आहे.
ब्रिटिश पंक, व्हर्सेल्सच्या राजेशाही फॅशन आणि प्राचीन सिल्क रोड इत्यादी शैली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवली जाईल. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात १९व्या आणि २०व्या शतकातील कापड, मातीच्या वस्तू आणि दुर्मीळ पुस्तके ही तीन प्रकारची प्रदर्शने पाहायला मिळतील. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील जॉन फोर्ब्स वॉटसन हा संग्रह या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. गुजरातमधील पटोला साडी आणि इतर प्रकारच्या साड्या कशा प्रकारे तयार केल्या जातात हे गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चरच्या आर्ट कॅमेऱ्याद्वारे ‘गीगापिक्सल’ चित्राद्वारे पाहिले जाऊ शकते, हा सादरीकरणाचा मुख्य हेतू आहे.
या वेळी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या संचालिका आणि व्यवस्थापकीय विश्वस्त तस्निम झकारिया मेहता म्हणाल्या की, ‘आर्ट कल्चर’ हा प्रकल्प गुगलच्या कला आणि संस्कृती यांचा असल्याने आनंद होत आहे. १९व्या आणि २०व्या शतकापर्यंत मुंबईचे सर्वांत जुने डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयकडे पाहिले जाते. कापड, चिकणमातीच्या वस्तू आणि दुर्मीळ पुस्तके यांचा मोठा संग्रह आहे. जो आपल्या देशाच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवितो. आता जगभरातील लोकांना केवळ आपल्या प्रदर्शनाचे संकलन आॅनलाइन पाहण्याची संधी मिळणार आहे.