धुळे - वाग्देवता मंदिरात ऐतिहासिक वाड्:मयाचा खजिना

By Admin | Published: November 3, 2016 07:52 PM2016-11-03T19:52:23+5:302016-11-03T19:52:23+5:30

धुळयातील एके काळचे ख्यातनाम फौजदारी वकील शंकरराव देव यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मंदीर उभारणीत पुढाकार घेतला आणि उभे राहिले श्री समर्थ

Treasures of the historical capital of Dhule - Vagdevta Temple | धुळे - वाग्देवता मंदिरात ऐतिहासिक वाड्:मयाचा खजिना

धुळे - वाग्देवता मंदिरात ऐतिहासिक वाड्:मयाचा खजिना

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 03 -  धुळयातील एके काळचे ख्यातनाम फौजदारी वकील शंकरराव देव यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मंदीर उभारणीत पुढाकार घेतला आणि उभे राहिले श्री समर्थ वाग्देवता मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी पूजन होते ते वाड््:मयाचे़ कुणी येऊन पुस्तके वाचतं तर कुणी या मंदिरातील ऐतिहासिक बाडं उत्सुकतेने न्याहाळतं असं संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा़देवेंद्र डोंगरे अभिमानाने सांगतात. 
शहरामध्ये एक भव्य पुरातन दगडी वास्तु ताठ मानेने गेली ७५ वर्षे दिमाखात उभी आहे़ संपूर्ण भारतात ब्रिटिशविरोधी लढ्याला व्यापक स्वरूप येत असतानाच धुळ्यातील शंकरराव देव यांनी सन १८९३ मध्ये सत्कार्योत्तेजक सभा स्थापन केली. त्याद्वारे खान्देशात त्यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे समाजाला सतत जागृत ठेवले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे श्री समर्थ वाग्देवता मंदिर असून या भव्य दगडी वास्तूमध्ये महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ज्या व्यक्तींबद्दल नितांत आदर आहे अशा शिव-समर्थांच्या पवित्र स्मृती याठिकाणी वस्तूरूपाने जतन करण्यात आल्या आहेत़ रोहिड खोऱ्यातील देशमुखांच्या विनंती विषयीचा संदर्भ असलेले शिवराजमुद्राधारित मूळ पत्र आपल्याला इथे पाहावयास मिळते़
शंकरराव देव यांच्यावर लोकमान्य टिळकांचा मोठा प्रभाव होता. पारतंत्र्यातील समाजाला जागृत करायचे असेल, तर समर्थ विचारच उपयोगी आहेत, यावर त्यांची ठाम श्रद्धा होती. त्यानुसार त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे जुने मठ, अन्य संतांचे मठ, तेथील मठाधिपती यांना सातत्याने भेटी दिल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडील जुने ग्रंथ, कागदपत्रे मिळवली, त्यांचा संग्रह केला.
श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सर्व भारतीय भाषांमधील कागदपत्रे आहेत. साधारण १०० ते ६०० वर्षांपूर्वीची ही कागदपत्रे, ज्यात संस्कृत, उर्दू आणि प्राकृत भाषेचाही समावेश आहे. त्याशिवाय देवनागरी, उर्दू आणि मोडी लिपीतीलही कागदपत्रे आहेत. हे ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासण्यासाठी विविध वयोगटातील व्यक्ती वाग्देवता मंदिराला भेट देत असतात़ अनेकांनी याठिकाणी उपलब्ध असलेल्या साहित्यावर पीएचडी देखील केली आहे़ श्री समर्थ वाग्देवता मंदिर ही संस्था जर्जर करणाऱ्या कालावरही मात करून नवनवोन्मेषाने अनेकविध कार्यात आज पुढे आहे व भविष्यातही राहील़

दुर्मिळ व अलौकीक ठेवा.
शिवकालीन व समर्थकालीन हस्ताक्षरांचे नमुने व ग्रंथ संग्रहांसोबत अनेक चमत्कृतीपूर्ण वस्तुही येथे आपले लक्ष वेधून घेतात़ यामध्ये इ़स़ १८२० मध्ये ग्रँड डफसाठी प्रतापगडाच्या देवीचे शिक्के उतरविलेला कागद, बोटाच्या चिमटीत मावतील एवढ्या आकाराच्या दोन सुवाच्य भगवद्गीता, दोन ताम्रपट, एकाच कागदावर मावतील असे २०५ मनाचे श्लोक, श्रीसमर्थ शिष्य-प्रशिष्य-सांप्रदायिक अशा लहानथोर ग्रंथकारांचे विविध भाषांमधील ग्रंथ, अनेक बखरी, त्याशिवाय व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, मंत्रतंत्र, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, संगीत, यंत्रे, शिक्के-मुद्रा, मजकूर-आकार, तुलसी रामायण, ऐतिहासिक दस्तावेज अशा अंदाजे ३ हजार २०० च्या आसपास ग्रंथातील बहूविध विषयांवर संशोधन येथे पूर्णत्वास आले आहे़ आज ५ हजारांवर बाडांच्या संग्रहांचा दुर्मिळ व अलौकीक असा ठेवा याठिकाणी पाहावयास मिळतो़

Web Title: Treasures of the historical capital of Dhule - Vagdevta Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.