लांजात शैव लेण्यांचा खजिना
By admin | Published: November 2, 2016 04:47 AM2016-11-02T04:47:06+5:302016-11-02T04:47:06+5:30
कोकणचे वर्णन केळीचे वन, आमराई, निळाशार समुद्र असे करतात. मात्र कोकणच्या इतिहासात डोकावले असता नवाश्मयुगाच्या पाऊल खुणा सहज सापडतात.
महेश चेमटे,
मुंबई- कोकणचे वर्णन केळीचे वन, आमराई, निळाशार समुद्र असे करतात. मात्र कोकणच्या इतिहासात डोकावले असता नवाश्मयुगाच्या पाऊल खुणा सहज सापडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे-कातळगावात लेणीसमूह आणि एकदगडी मंदिरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे इतिहास आणि पुरातत्व विषयात आवड असणाऱ्यांसाठी कोकणात ‘खजिना’ असल्याचे मत लेणी संशोधक आणि अभ्यासक डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
रत्नागिरीतून गोव्याकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग १७ च्या शेजारी इंदावटी मार्गावर वनगुळे गावात एकाच (जांभा) दगडात कोरलेली चार मंदिरे सापडलेली आहेत. त्यातील तीन मंदिरे ही ब्राम्हणवाडीत आणि एक बौद्धवाडी पाहायला मिळते. लांजापासून पश्चिमेस ७ किमी अंतरावर हे आहेत. ही मंदिरे साधारण ६ ते ७ फूट उंचीची आहेत.
त्यात एक गर्भगृह, नागाचा फणा धारण केलेली गणेशमूर्ती, शिवलिंग दिसून येतात. शिलाहारकालीन ही वास्तू असून मंदिरे पाहता गोवा कूसगाव येथे अस्तित्वात असणाऱ्या एकदगडी देवळांची आठवण येत असल्याचे लेणी अभ्यासकार सांगतात.
जावडे-भोईर गावात सात शैव लेण्यांचा समूह दिसतो.जांभ्या दगडात असल्याने शिल्पात कोरीव काम करणे जरी अवघड असले तरी महत्त्वाची शिल्पे दिसून येतात. यात प्रामुख्याने नागदेवता, शिवलिंग, गणपती, विष्णू, लाकूलिश किरीटार्जुन, ब्रम्ह आणि हत्तीवर बसलेल्या दोन व्यक्ति या शिल्पांचा समावेश आहे. लेण्यांच्या शेजारील कुंडात वेरुळ येथील गणेशलेणींशी साधर्म्य असलेल्या लेणी अपूर्णावस्थेत असल्याचे कोठारेयांनी सांगितले.
लांजा येथील मानवरुपी शिल्पे, २ मीटर लांबीच्या माशाचे शिल्प देखील पाहायला मिळतात. कोकण किनाऱ्याहून दख्खनकडे जाणारा व्यापारी मार्गाचे नकाशे येथे कोरलेले दिसतात. शिल्पांपासून २ किमी अंतरावर कुंडाभोवती शैव लेणी आढळतात.
साधूंना राहण्यासाठी नसून पूजेसाठी या लेण्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे लेण्यांमुळे कुंडाचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी पाणी जाण्यासाठी ओढा निर्माण करण्यात आल्याच्या खुणा येथे असल्याची माहिती कोठारे यांनी दिली. (क्रमश:)
> सात लेण्यांची वैशिष्ट्ये
शैव लेण्यांपैकी पहिली लेणी ८ फुटी नैसर्गिक गुफेंत आहे. येथे पोहचण्यासाठी दगडी पायऱ्या सध्या तरी अस्तित्वात आहेत. दुसऱ्या लेण्यांमध्ये दोन फुटी सुखासन यक्ष (एक पाय दुमडलेला) आणि नरसिंहाशी मिळते-जुळते शिल्पे आहेत. तिसऱ्या लेण्यांमध्ये ५.४ फुट उंच असलेली विष्णूची चर्तुभूज मुर्ती कोरल्याचे दिसून येते. विष्णूच्या शिरावरील टोपी विठ्ठलाच्या मुर्तीची आठवण करुन देते. वाकाटक काळ सदृश्य मुर्तीची कोरीव काम असून त्यात शंख, चक्र,गदा, पद्म ही आभुषणे साज चढवतात. कुडांशेजारील लेण्यांमध्ये लाकुलिश (पशुपथ पंथ स्वामी) दिसून येतो. शिवाय अन्य लेण्यामंध्ये ४.७ फुट उंचीची उभी ब्रम्हमूर्ती आहे. त्याचबरोबर हत्तीवरील स्त्री, पुरुषांची स्वारी करणारे स्त्री-पुरुष, तपश्चर्या करणारा अर्जुन (किरीटाअर्जुन ) त्याच्या शेजारी बसलेला भक्त अशी शिल्पे लेण्यांमध्ये दिसून येतात.
स्थानिकांचे सहकार्य : दुर्गम डोंगर रांगात लेण्यांचा शोध घेताना फिरत असताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले. त्यात दिनेश मोहिते, पांडुरंग सोडे, प्रथमेश भिडे, सुमित रांबाडे, प्रसाद पराडकर (वनगुळे) यांचे विशेष सहकार्य लाभले. यांना डोंगराळ भाग, पाणवठा, पायवाटा, यांची योग्य माहिती असल्याने त्याचा फायदा झाल्याचे डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी सांगितले.