राज्यात उष्माघाताच्या १९६ रुग्णांवर उपचार, तापमानाचा पारा चढाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:04 AM2019-05-01T03:04:03+5:302019-05-01T03:04:22+5:30
मान्सून जवळ येत असला, तरी सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा चढाच आहे. विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील तापमानही नगारिकांसाठी तापदायक ठरत आहे.
मुंबई : मान्सून जवळ येत असला, तरी सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा चढाच आहे. विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील तापमानही नगारिकांसाठी तापदायक ठरत आहे. मुंबई, ठाण्यासारख्या किनारी भागातील दमट हवेमुळे उष्माघाताचा धोका नसला, तरी कडक उन्हामुळे चक्कर येणे, अस्वस्थता ही लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचा त्रास झालेल्या १९६ रुग्णांनी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेतले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या उकाड्याचा त्रास राज्यभर नागरिकांना जाणवू लागला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाकडील माहितीनुसार, उष्माघातामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील १९६ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याशिवाय परभणी, धुळे आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, बरेच रुग्ण उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. वेळीच काळजी घेतल्यास या उष्ण वातावरणातही तग धरता येईल. उन्हाळ्यात शेतावर किंवा मजुरीची कामे करताना शरीरातील पाणीसाठा कमी झाला की, उष्माघात होतो. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कडक उन्हाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत असला, तरी उष्म्याचा त्रास या ना त्या स्वरूपात होत राहतो. अनेकांना त्यांचा शारीरिक त्रास हा उष्णतेमुळे होत असल्याचेही पटकन लक्षात येत नाही. अस्वस्थता, मानसिक गोंधळ हीदेखील याचीच लक्षणे आहेत. त्यामुळे असा त्रास जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ.आवटे यांनी सांगितले.
काही लक्षणे
संपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखविण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत, तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते.
उपचार
उष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास अशा व्यक्तीस मोकळी हवा, सावलीत घेऊन जावे, ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले, तरी पाणी, नारळपाणी ठरावीक अंतराने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते.
उन्हाळ्यात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळावीत. कोणत्याही स्वरूपातील मद्य टाळावे. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो, शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा वाढले की, स्नायू, मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूत्राचा रंग गडद पिवळा झाला, डोकेदुखी वाढली किंवा भोवळ आली, तर तातडीने औषधोपाचार करावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ न देणे सर्वात गरजेचे आहे. उष्मा वाढला की, सतत पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी शरीराला ग्लुकोज व क्षारांचा पुरवठा होणे गरजेचे असते. एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले जलसंजीवनी पेय यासाठी उत्तम असते. मात्र, अतिसाखरयुक्त सरबत टाळा, हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घालावेत. उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा.
घाम अंगावर सुकू देऊ नका. उन्हात कष्टाचे काम करू नका, काही कारणाने उन्हात थांबावे लागले, तर भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर जाड कापड गुंडाळावे. अधूनमधून सावलीत जावे.