नवी मुंबईतही होणार कर्करोगावर उपचार
By admin | Published: January 24, 2016 02:36 AM2016-01-24T02:36:43+5:302016-01-24T02:36:43+5:30
कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा परेलपर्यंतचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबई गाठणे प्रत्येक वेळा शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच टाटा रुग्णालयाने
मुंबई : कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा परेलपर्यंतचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबई गाठणे प्रत्येक वेळा शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच टाटा रुग्णालयाने कर्करोगाच्या उपचारांचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन वर्षांत लहान कर्करोग रुग्णांना आणि रक्ताच्या कर्करोग रुग्णांना नवी मुंबईच्या ‘अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’(अॅक्ट्रॅक) येथे उपचार मिळणार असल्याचे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.
कर्करोग रुग्णांवर उपचार करतानाच या विषयावर संशोधन करण्यासाठी, २००२ मध्ये नवी मुंबई येथे टाटा रुग्णालयाने अॅक्ट्रॅक केंद्र उभे केले होते. पहिल्या काही वर्षांत या केंद्रामध्ये फक्त संशोधन व्हायचे. आता या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. काही रुग्णांवर संशोधनाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. या ठिकाणी १११ खाटा आहेत. नवी मुंबई, रायगडच्या रुग्णांना आता इथे थेट उपचार मिळत आहेत, पण पुढच्या दोन वर्षांत इथे रक्ताच्या कर्करोग रुग्णांसाठी आणि लहान कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, पण परेलला येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी येथे बाह्य रुग्ण विभाग सुरूराहणार आहे. त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना नवी मुंबईला पाठवण्यात येईल, असे डॉ. बडवे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईच्या केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. २०१४ मध्ये या केंद्रात हेड अँड नेक कर्करोगाच्या ४५०, स्तनाच्या कर्करोगाच्या ७८०, न्यूरोलॉजीसंबंधी कर्करोगाच्या २४०, पोटाच्या कर्करोगाच्या ४०० आणि लहान कर्करोग रुग्णांच्या ९० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अनेक महिलांच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक पातळीवर असतानाच होते, पण मेमोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे स्तन काढून टाकण्याशिवाय महिलांना पर्याय नसतो. नवी मुंबई केंद्रात आणलेल्या नवीन मेमोग्राफी मशीनमुळे अतिशय सूक्ष्म परीक्षण करता येऊ शकते. त्यामुळे महिलांचा स्तन वाचवण्यास मदत होईल, असे डॉ. सुदीप गुपा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संकेतस्थळावर नोंदणी
लहान मुलांना कर्करोग झाल्यावर पालक हादरतात. त्यांना काय करावे, कुठे, कसे जावे हे कळत नाही. अशा अवस्थेत पालकांना मदतीचा हात देण्यासाठी लहान कर्करोग रुग्णांची संकेतस्थळावरच नोंदणी व्हावी, अशी यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे.
म्हणजे मुलाचे निदान झाल्यावर पालकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली की, त्यांना घरून आणण्यासाठी गाडी पाठवण्यात येईल. त्यांना रुग्णालयात आणून उपचार केले जातील आणि पुन्हा घरी सोडण्यात येईल. ही यंत्रणा उभी करायची असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले.