देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

By admin | Published: May 21, 2016 05:13 AM2016-05-21T05:13:37+5:302016-05-21T05:13:37+5:30

देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे.

Treatment treats only one in 10 human beings in the country | देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

Next


मुंबई : देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे. या आरोग्य कार्यक्रमांत शारीरिक आजारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पण, देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी सर्वांनाच अजूनही कमालीची अनभिज्ञनता आहे. कारण, १० मनोरुग्णांपैकी एकच मनोरुग्ण उपाचार घेतो. तर, तीन लाख लोकसंख्येमागे एकच मानसोपचार तज्ज्ञ देशात असल्याचे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सध्या सर्वांचीच जीवनशैली ताणतणावाची झालेली आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे कामाच्या डेडलाइन, वाढीव कामाचे तास या सगळ्याचा ताण सतत येत असतो. त्यातच बदलत्या नातेसंबंधांमुळे मानसिक ताणात भर पडते आहे. पण, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अजूनही मानसिक आजारांबाबतची जनजागृती हवी तशी न झाल्याने लोक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. याचा गंभीर परिणाम मोठ्या समूहांच्या मानसिकतेवर होताना दिसत असल्याचे लॅन्सेटमध्ये नमूद केले आहे.
जगातील एक तृतीयांश मनोरुग्ण हे भारत आणि चीन या देशांमध्ये आहेत. मनोरुग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. पण, २०२५पर्यंत भारत मानसिक आजारांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल, अशी भीतीही या अहवालात नमूद केली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांना कमी मानसिक उपचार मिळत आहेत. मनोविकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ३ लाख लोकसंख्येमागे फक्त १ मानसोपचारतज्ज्ञ आहे. चिंता आणि उदासीनता या दोन प्रमुख आजारांनी सर्वाधिक व्यक्ती ग्रस्त आहेत. व्यक्ती किती वर्षे जगतो. त्यापेक्षा किती वर्षे सुदृढ आयुष्य जगला याला ‘हेल्दी लाइफ इयर’ असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. या संकल्पनेनुसार, २०१४ या वर्षात देशात ३१ दशलक्ष वर्षे फुकट गेलेली आहेत. तर, हा आकडा २०२५पर्यंत ३८ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी ३८ दशलक्ष वर्षे फुकट जातील, असेही लॅन्सेटच्या अहवालात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
>मानसिक रोगांवर उपचार करणाऱ्यांची गरज वाढत जाणार
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येत्या १० वर्षांमध्ये मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची गरजही वाढणार आहे. भारतीय लोकांचे जीवन उत्तरोत्तर गतिमान होत चालले आहे, त्याचप्रमाणे सामाजिक बंधांमध्ये झालेले बदलही नव्या ताणांची निर्मिती करते. अशा स्थितीत येत्या दशकभरात मानसोपचार करणारे तज्ज्ञही तितक्याच संख्येने निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा इतर करिअरकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे या करिअरकडे पाहिले पाहिजे. एक मनोविकारतज्ज्ञ पूर्ण क्षमतेने तयार होण्यासाठी नऊ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे पुढील गरज ओळखून आताच तयारी करावी लागते. मानसिक आजारांवरील उपचार करण्यास तज्ज्ञ नसतील तर ती पोकळी भोंदू किंवा अंधश्रद्धा पसरवणारे लोक घेण्याची भीती मोठी आहे. - डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ज्ञ

Web Title: Treatment treats only one in 10 human beings in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.