महिलेच्या उपचारासाठी ३ दिवस तब्बल ६० किलोमीटरची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:34 AM2018-01-13T02:34:08+5:302018-01-13T02:34:20+5:30
छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.
लाहेरी (गडचिरोली) : छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील गरेकल (जि. नारायणपूर) येथील माहरी बोळंगा पुंगाटी ही आजारी पडली. परंतु तिच्या गावापासून जिल्हा मुख्यालय सुमारे ८० किमी अंतरावर असून रस्ता व वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे नातेवाईकांनी तिला गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्याचे ठरविले. त्यासाठी खाटेची कावड करुन त्यात तिला बसविले आणि ९ जानेवारीला गरेकल येथून प्रस्थान केले.
उपचार सुरू, प्रकृती स्थिर
गरेकल हे गाव भामरागड तालुक्याच्या सीमेवरून पलिकडे ४० किमी अंतरावर आहे. सीमेपासून लाहेरी २० किमी अंतरावर आहे. ६० किमी अंतर महिला रुग्णासह ६ नातेवाईकांनी तीन दिवसात पार करुन ते गुरूवारी सायंकाळी लाहेरी आरोग्य केंद्रात एकदाचे पोहोचले.
आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी तिच्यावर लगेच उपचार सुरू केला. त्यानंतर रुग्णवाहिकेने भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीही स्थिर आहे.
दोन ठिकाणी मुक्काम
गरेकल येथून निघाल्यानंतर महिला रुग्णासह सहा नातेवाईकांनी दोन ठिकाणी मुक्काम केला. दरम्यान कोसरी (भात) शिजवून प्रवासातच खाल्ले.
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील पद्देवाही येथील महिला सुमन मडावी हिचा मृतदेह १० जानेवारीला विहिरीत आढळून आला होता. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांना तिचा मृतदेह बैलबंडीत टाकून रुग्णालयापर्यंत आणावा लागला होता.