मोडनिंबच्या तरुण मंडळाने वृक्ष संवर्धनासाठी बसविला वृक्ष गणपती
By Admin | Published: September 7, 2016 02:56 PM2016-09-07T14:56:57+5:302016-09-07T14:56:57+5:30
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंबमधील तरूणांनी चक्क लिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे.
शिवाजी सुरवसे, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ - मी देवळात नाही़, मी दगडात नाही़, मी झाडात आहे असा संदेश देत सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरण विषयक काम करणा-या तरुणांनी चक्क लिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे. वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा इको फ्रेंडली गणपती उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे त्याप्रमाणे झाडे झाडांमध्येच सर्व काही आहे हे दाखविण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे. मोडनिंब मधील रेल्वे स्टेशन रोडवर संगनबसवेश्वर मठाजवळ लष्कर ए शिवबा प्रतिष्ठान संचलित वीर मराठा गणेशोत्सव मंडळ ही गणेशाची मुर्ती बसविली आहे. गतवर्षी या मंडळाने बाबूंच्या कामठ्यांपासून बाहुबलीस्टाईलमध्ये दहा फुटाची गणपती मुर्ती बसविली होती़. दरवर्षी काही तरी नवीन करणे आणि पर्यावरण जागृतीचे काम करणे हा उद्देश मंडळाने ठेवला आहे.
संतोष लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान घाडगे, जगदीश डांगे, रणजित सुरवसे, किरण व्यवहारे, विजय परबत, धनाजी लादे, सोमनाथ माळी, शितल महाडीक, विजय बुरंडे, स्वाधीन थोरात यांच्या सहकाराने ही कल्पना मुर्त रुपात आल्याचे केदार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असा संदेश देत यंदाच्या वर्षी शासनाने वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी विशेष लक्ष दिले. झाडे लावली तरचं आपले भविष्य चांगले आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी पर्यावरण पूरक गणपती बसवितो़ लिंबाच्या झाडामध्ये सोंड दिसली त्याला आम्ही गणपती बनविले आणि ख-या अर्थाने हा उत्सुकतेचा गणपती बनला.
राहूल केदार, वीर मराठा गणेशोत्सव मंडळ, मोडनिंब