आरेतील वृक्ष मृत्यूपंथाला...
By admin | Published: April 25, 2016 05:46 AM2016-04-25T05:46:35+5:302016-04-25T05:46:35+5:30
पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी आरे प्रशासन कूपनलिकेला परवानगी देत नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा वाद पेटला असतानाच, येथील वृक्ष पाण्याविना जळत असल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू बंगर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथील सुमारे ३ हजार २५० एकरवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. शिवाय मेट्रो कारशेडच्या नावाखाली येथील वृक्षांचा बळी घेतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील वृक्षांची कत्तलही होत असून, त्याकडे आरे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आरे कॉलनीमधील वृक्षांना पाणी देता यावे, म्हणून आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत हे कूपनलिकेसाठी परवानगी देत नसल्याने, प्रश्न आणखी जटील झाला आहे, असेही बाळू बंगर यांनी सांगितले. यापूर्वी जेव्हा येथील वृक्ष तोडण्यात आले, तेव्हा सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा झाडांची लागवड करण्यात आली, परंतु सातत्याने असे प्रकार होत असल्याने येथील वनराई कशी टिकून राहणार, असा सवाल बाळू बंगर यांनी केला आहे.
आरे कॉलनीमधील वृक्ष पाण्याभावी जळू नयेत, म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते डोक्यावर घागर घेऊन येथील वृक्षांना पाणी घालत आहेत.