सावलीसाठी ‘देवा’ जगवतोय स्मशानातील वृक्ष, हातपंपावरून दूरवरून आणताहेत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:04 AM2022-04-12T08:04:43+5:302022-04-12T08:05:10+5:30

गाव परिसरात ‘देवा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजुरा येथील सुदामा नामक ६० वर्षीय गृहस्थ गावच्या स्मशानभूमीसह अन्य ठिकाणच्या वृक्षांना जगविण्यासाठी भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धडपडत आहेत.

trees plantation in the cemetery bringing water from far away | सावलीसाठी ‘देवा’ जगवतोय स्मशानातील वृक्ष, हातपंपावरून दूरवरून आणताहेत पाणी

सावलीसाठी ‘देवा’ जगवतोय स्मशानातील वृक्ष, हातपंपावरून दूरवरून आणताहेत पाणी

Next

यशवंत हिवराळे 

राजुरा (जि. वाशिम) :

गाव परिसरात ‘देवा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजुरा येथील सुदामा नामक ६० वर्षीय गृहस्थ गावच्या स्मशानभूमीसह अन्य ठिकाणच्या वृक्षांना जगविण्यासाठी भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धडपडत आहेत. सूर्य आग ओकत असतानाही ५०० ते ७०० मीटर अंतरावरील हातपंपाचे पाणी हापसून वृक्षांना पाणी घालण्याचे पूण्यकर्म त्यांच्या हातून घडतेय. 

सुदामा लोडजी पातळे हे मालेगाव तालुक्यातील राजुराचे अल्पभूधारक शेतकरी. बारमाही घरचीच गुरे-ढोरे वळण्याचे काम करतात. सततचा हसतमुख चेहरा, मनमिळाऊ वागणे, बोलणे व कृतिशीलपणामुळे त्यांना तरुणपणीच ‘देवा’ ही उपाधी गावकऱ्यांनी बहाल केली. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये ते  ‘देवा’ नावानेच ओळखले जातात.

 बाराही महिने ऊन, वारा, पाऊस झेलत रोज सकाळी उठून गुरे सोडणे, दिवसभर उन्हातान्हात गुरांमागे वणवण भटकंती हा ‘देवा’ यांचा ठरलेला नित्यक्रम. तीन वर्षांपासून स्मशानभूमी तसेच गुराढोरांसाठीच्या सार्वजनिक गोठाणाजवळ लावलेल्या वृक्षांना वाचविण्यासाठी सुदामा पातळे हे दूरवरून पाणी आणत आहेत. 

हातपंपावर स्वत: हापसतात पाणी 
रोज नित्यनेमाने सकाळी गुरे चरायला सोडण्यापूर्वी तर सायंकाळी गुरेढोरे गोठ्यात बांधल्यानंतर ते जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील सार्वजनिक हातपंपावर जातात. स्वत: पाणी हापसतात. हंडा भरला की डोईवर घेतात. वृक्षांजवळ येत मुळांना पाणी देतात. वृक्ष संगोपनाचे मोठे काम आपण करीत आहोत, हे त्यांच्या गावीही नाही. वृक्ष संगोपनासाठी धडपडणारे हे व्यक्तिमत्व परिसरात एक आदर्श ठरले आहे.

सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड
उन्हाळ्यात जनावरे चारताना त्यांना सावलीचे महत्त्व कळाले. त्यानंतर ‘देवा’ची पाऊले वृक्षरोपणाकडे वळाली. स्मशानभूमी परिसर, गुरांच्या सार्वजनिक गोठाणाजवळ एकही वृक्ष नसल्याने तीन वर्षांपूर्वी तेथे देवाने वड, पिंपळ, निंब, बेल यांसह घनदाट सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली. तेव्हापासून नित्यनेमाने हातपंपावरून पाण्याचा हंडा डोक्यावर घेत ते वृक्षांना पाणी घालत आहेत.

Web Title: trees plantation in the cemetery bringing water from far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.