नागोठण्याजवळच्या अवचित गडावर अडकले होते ट्रेकर्स, दारु पिऊन ट्रेकर्सवर दादागिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 10:36 AM2017-12-25T10:36:25+5:302017-12-25T10:38:48+5:30
नाताळच्या सुट्टया सुरु होताच ट्रेकर्सची पावलं गड-किल्ल्यांकडे वळली आहेत. ट्रेकिंगची आवड असलेले तरुण-तरुणी थ्रील अनुभवण्यासाठी गड किल्ल्यांवर जात आहेत.
नागोठणे - नाताळच्या सुट्टया सुरु होताच ट्रेकर्सची पावलं गड-किल्ल्यांकडे वळली आहेत. ट्रेकिंगची आवड असलेले तरुण-तरुणी थ्रील अनुभवण्यासाठी गड किल्ल्यांवर जात आहेत. पण त्याचवेळी काही मद्यपी दारु पिऊन धिंगाणा घालून गडांचे पावित्र्य नष्ट करत आहेत. मुंबई-गोवा मार्गावर नागोठण्याजवळच्या अवचित गडावर रविवारी अशीच एक घटना समोर आली. अवचित गडावर रंगलेल्या दारु पार्टीमुळे काही ट्रेकर्स अडकून पडले होते.
सहा जण दारु पिऊन ट्रेकर्सवर दादागिरी करत होते. त्यावेळी एका ट्रेकरने सहयाद्री प्रतिष्ठानच्या गणेश रघुवीर यांना फोन करुन गडावर मद्यपींच्या धिंगाण्यमुळे त्रास होत असल्याची माहिती दिली. रघुवीर यांनी रोहा येथे राहणारे विशाल तेलंग यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर विशाल तेलंग यांनी गडाजवळ राहणा-या स्थानिक गावक-यांच्या मदतीने सूत्रे हलवली.
गावक-यांनी चार मद्यपींना खाली आणले असून दोघे जण पुन्हा गडाच्या दिशेने पळून गेले. गावकरी पळालेल्या दोघांचा शोध घेत आहेत. सर्व ट्रेकर्स सुरक्षित असून या प्रकरणी नागोठणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दारुची पार्टी करणारे हे तरुण स्थानिक असल्याची माहिती आहे. गडकिल्यांवर दारूच्या पार्ट्या आतापासून सुरु झाल्यात स्थानिकांनी पोलीस स्थानकात या विषयी आत्ताच पत्र द्यावे असे आवाहन ट्रेकर्सनी केले आहे.