कोपर्डी खटल्यात तीनही आरोपीं दोषी, बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध, शिक्षेबाबत मंगळवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 05:19 AM2017-11-19T05:19:38+5:302017-11-19T07:09:32+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणा-या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाच्या खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी धरले. त्यांच्याविरोधात बलात्कार, खून प्रकरणी आरोप सिद्ध झाले आहेत.
अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणा-या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाच्या खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी धरले. त्यांच्याविरोधात बलात्कार, खून प्रकरणी आरोप सिद्ध झाले आहेत.
दोषींच्या शिक्षेबाबत मंगळवार व बुधवारी सुनावणी होणार आहे. पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) या दोषींच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप व फाशी या शिक्षेची तरतूद असल्याचे न्यायालयाने सुनावणीत सांगितले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी मुख्य आरोपी शिंदे याला कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे तसेच पॉक्सो कायद्याखाली दोषी धरले. आरोपींना दोषी ठरवण्यात यश आल्याबद्दल अॅड. उज्ज्वल निकम यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
दोषींच्या चेह-यावर काहीही भाव नाही
पप्पू शिंदे व नितीन भैलुमे हे कोपर्डीचे रहिवासी आहेत, तर संतोष भवाळ हा कर्जत तालुक्यातीलच खांडवी येथील आहे. त्यांना सकाळी साडेनऊ वाजताच बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. दोषी धरल्यानंतर ते स्तब्ध होते. त्यांच्या चेहºयावर काहीही भाव नव्हते.
या कलमांखाली दोषी
जितेंद्र शिंदे यास कटकारस्थान, अत्याचार करणे, खून करणे व छेडछाड करणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो) कलम ६, ८ व १६ प्रमाणे दोषी धरले़ या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीची तरतूद आहे़
संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना मुलीची छेडछाड, अत्याचार व खुनाचे कटकारस्थान, गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणे (कलम १०९), तसेच पॉक्सो कायद्याखाली दोषी धरले आहे़
अधिक शिक्षेसाठी होणार युक्तिवाद
दोषींच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर मंगळवारी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील. त्यानंतर त्याच दिवशी किंवा न्यायालयाने ठरविलेल्या पुढील तारखेला शिक्षा सुनावली जाईल. न्यायालयात शनिवारी मोठा पोलीस बंदोबस्त होता. कोपर्डीत गतवर्षी १३ जुलैला अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या झाली होती. एक वर्षे चार महिन्यांनंतर आरोपींना दोषी धरले गेले.
पीडितेच्या आईला अश्रू अनावर
पीडित मुलीची आई, वडील न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. तीनही आरोपींना दोषी धरल्यानंतर त्यांना व ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. दोषींना फाशीच व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली. सर्व समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. तसेच उज्ज्वल निकम यांनी हा खटला यशस्वीपणे लढविला त्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
निघाले होते मराठा क्रांती मूक मोर्चे
कोपर्डीच्या संतापजनक घटनेनंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. या महामोर्चांनी वर्षभर समाजमन ढवळून निघाले. शासनालाही या मोर्चांची दखल घ्यावी लागली.
त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी
या निर्णयाने ‘त्या’ भगिनीला न्याय मिळाला. आपण ‘त्या’ भगिनीला परत आणू शकत नाही. नराधमांना शिक्षा मिळाल्याने पुन्हा असे कुणी करणाार नाही. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
विविध आठ कलमांन्वये न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले आहे. घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. - अॅड. उज्ज्वल निकम,
विशेष सरकारी वकील