धावत्या रिक्षात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

By Admin | Published: June 9, 2017 06:04 AM2017-06-09T06:04:40+5:302017-06-09T06:04:40+5:30

२३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

Trial of sexual assault on a woman in a rickshaw | धावत्या रिक्षात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

धावत्या रिक्षात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तीनहातनाका येथून रिक्षात बसलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या तरुणीने मोठ्या धाडसाने रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला जोरदार प्रतिकार केल्यानंतर तिला चालत्या रिक्षातून बाहेर फेकण्यात आले. या घटनेने स्वप्नाली लाड प्रकरणाची घटना ताजी झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
चितळसर-मानपाडा भागात राहणारी तरुणी कामावरून सुटल्यानंतर ७ जून रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे रिक्षाची वाट पाहत उभी होती. कासारवडवलीकडे जाणाऱ्या शेअर रिक्षात ती बसली. रिक्षात आधीच खाकी शर्ट घातलेला प्रवासी होता. पातलीपाडा येथे जाणाऱ्या अन्य एका प्रवाशाला नकार देऊन रिक्षा ९.४० वा. निघाली. रिक्षा कॅडबरी उड्डाणपुलावर मधोमध आल्यानंतर आधीच प्रवासी म्हणून बसलेल्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराचा तिने तीव्रपणे प्रतिकार केला. तेव्हा, त्याने केलेल्या मारहाणीत तिच्या ओठांना आणि डोळ्यांना मार लागला. तशाही अवस्थेत तिने आरडाओरड करून आपल्या वडिलांना फोन लावला. या झटापटीत फोन रिक्षातच पडला. त्याच वेळी अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याने ‘आता तुला खल्लास करतो, काढ रे सामान,’ अशी धमकीही तिला दिली. दरम्यान, तिने जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केल्याने रिक्षाचालकाने अखेर ‘सोडून द्या तिला’ असे म्हणत रिक्षाचा वेग काहीसा कमी केला. त्याच वेळी तिच्याशेजारी बसलेल्याने तिला टीसीएस कंपनीच्या गेटजवळ रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिथे जमलेल्या काही लोकांपैकी एकाच्या मोबाइलवरून तिने ही आपबिती आपल्या घरी कळवली. तिच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागला असून, एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
या प्रकरणी अपहरण करणे, विनयभंग, धमकी देणे आदी कलमांखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कळवा पोलीस ठाण्याच्या
महिला उपनिरीक्षक एम.जे. घाडगे यांनी या तरुणीची रुग्णालयात जाऊन तक्रार नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>असे आहे वर्णन...
रिक्षाचालक पांढरा शर्ट घातलेला, सडपातळ, २० ते २५ वयोगट, उंची साधारण पाच फूट; तर प्रवासी म्हणून बसलेला त्याचा साथीदार रंगाने सावळा, मजबूत, ३० ते ३५ वयोगट, खाकी रंगाचा युनिफॉर्म आणि मराठी भाषिक असल्याची माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली.
>स्वप्नाली लाडनंतर दुसरे प्रकरण
अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या स्वप्नाली प्रकरणानंतर असे दुसरे प्रकरण घडले असून त्याही वेळी रिक्षाचालकावर संशय आल्याने तिने रिक्षाबाहेर उडी घेतली होती. त्या वेळी रिक्षाचालकाने तिला आरशातून इशारे केले होते.या वेळी मात्र प्रवासी म्हणून बसलेल्या रिक्षाचालकाच्या साथीदारानेच थेट अत्याचाराचा प्रयत्न केल्याने रिक्षाचालक पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.त्या प्रकरणानंतर वाहतूक शाखेच्या तत्कालीन उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी शहरातील सर्वच रिक्षाचालकांची माहिती रिक्षात दर्शनी भागात ठेवणे बंधनकारक केल्यानंतर अशा प्रकरणांना आळा बसला होता.
या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू आहे. त्यासाठी चार पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
- डी.एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

Web Title: Trial of sexual assault on a woman in a rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.