आदिवासी पाड्यात श्रमदानातून साकारला रस्ता!
By Admin | Published: October 9, 2016 02:09 AM2016-10-09T02:09:07+5:302016-10-09T02:09:07+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यात शासनाच्या मदतीविना श्रमदानातून रस्ता साकारण्यात आला आहे.
अनिल गवई
खामगाव (जि. बुलडाणा), दि. 0८- जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यात शासनाच्या मदतीविना श्रमदानातून रस्ता साकारण्यात आला आहे. यामुळे दळण-वळण सुलभ झाले असून रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी नेण्याची सोयही झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या आदिवासी लोकवस्तीबहुल भागात अनेक ठिकाणी रस्ते पोहोचलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा आणि रुग्णांना उपचारासाठी नेताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी विदारक होत असल्याने, वडपाणी या गावात जाण्यासाठी श्रमदानातून रस्ता तयार करण्यात आला आहे. बंधारा खोलीकरण करून मुरुम तसेच शेताच्या बांधावरील दगडाचा या रस्त्यासाठी वापर करण्यात आला आहे. रस्त्याच्या निर्मितीसाठी महात्मा गांधी लोकसेवा संघ, तरुणाई फांऊडेशन आणि वडपाणी या आदिवासी गावातील युवकांनी पुढाकार घेतला. तब्बल दीड वर्षाच्या सातत्यपूर्ण अनेक हाताच्या परिश्रमातून रस्त्याची निर्मिती झाली आहे.
रस्त्यासाठी दिला शेतीचा हिस्सा!
गेल्या साठ दशकांपासून रस्ता नसल्याने नरक यातना काय असतात याचा अनुभव घेतलेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यासाठी श्रमदानासोबतच, स्वत:च्या शेतातील हिस्साही दान केला केला आहे. सुमजी सुमरा, तुफानसिंग खरत, ओंकार भगत या शेतकर्यांच्या मदतीविना हा रस्ता तयार होणे अशक्य होते. माजी सरपंच ज्ञानसिंग खरत यांच्या पुढाकारातून आदिवासी पाड्यातील शेतकर्यांनी रस्त्यासाठी जागा दिली.
असा करण्यात आला रस्ता!
जलसिंचनासाठी तयार करण्यात आलेल्या बंधारा खोलीकरणातील मुरूम, शेतातील दगड, नदीतील वाळूचा वापर करून रस्ता तयार करण्यात आला. यासाठी अनेक महिलांनी आपल्या मुरूमाळ शेतीतील दगडांची अक्षरक्ष: वेचणी करुन या रस्त्याच्या पुर्णत्वासाठी हातभार लावला.