‘बेटी बचाव’मध्ये आदिवासी आघाडीवर !
By admin | Published: December 26, 2016 05:10 AM2016-12-26T05:10:34+5:302016-12-26T05:10:34+5:30
कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत.
दिगांबर जवादे / गडचिरोली
कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत. मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासींमध्ये मात्र, याच्या विपरित चित्र पाहायला मिळते.
जन्माला येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे ते मोठ्या उत्साहात स्वागत करतात. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, चामोर्शी या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये २०१५-१६मध्ये मुलींचा जन्मदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुलींच्या जन्मदराची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरी भागांत मुलींचा जन्मदर प्रत्येकी एक हजार मुलांच्या मागे ९५० ते ९६०च्या दरम्यान आहे.
काही समाजांमध्ये तर उपवर मुलाला मुली मिळणे कठीण झाले आहे. भविष्यातील हे धोक्याचे निदर्शक आहे. याच पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर, माध्यम, प्रशासन यांच्या मदतीने शासन जनजागृतीही करीत आहे. तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपास
जन्माला येणाऱ्या बालकाचे हा आदिवासी आनंदाने स्वागत करतो. गडचिरोलीत मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहिला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये १ हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपास आहे.
भामरागड, चामोर्शी व एटापल्ली या तालुक्यांमध्ये तर मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक आहे. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या वर्षात भामरागड तालुक्यात एक हजार मुलांमागे १ हजार ३९ मुली जन्माला आल्या आहेत. चामोर्शी तालुक्याचा मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे १ हजार ३, तर एटापल्ली तालुक्यात मुलींचा जन्मदर १ हजार २७ एवढा आहे. हे चित्र आशादायी आहे.