आदिवासी साहित्य ‘दलित’मध्येच
By Admin | Published: May 20, 2016 01:46 AM2016-05-20T01:46:56+5:302016-05-20T01:46:56+5:30
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात असल्याची बाब माहिती अधिकारात उघड
पुणे : आदिवासींची स्वतंत्र अस्मिता असतानाही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
मराठी भाषा विभागातर्फे मराठी वाङ्मयनिर्मितीसाठी लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनातर्फे सर्वोत्कृष्ट पुस्तकास विविध साहित्य प्रकारांतर्गत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार दिले जातात. आदिवासी साहित्यासाठी डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ३३ वर्षांपासून प्रलंबित होता. या पुरस्कारासाठी आदिवासी साहित्याची नोंद दलित साहित्यात होत असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
लळीत रंगभूमीचे अध्यक्ष कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नातून आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात होत असल्याचे उघड झाले आहे.
राज्यात १९७२ मध्ये आदिवासी विकास संचालनालय; तसेच १९८३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्थापना झाली. ४४ वर्षे होऊनही स्वतंत्र आदिवासी विभाग असतानाही आदिवासी साहित्याची नोंद स्वतंत्र होत नसल्याचे समोर आले आहे.
आदिवासी साहित्यासाठी मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीत ३ सप्टेंबर २०१५ रोजी चर्चेस आला होता.
हा प्रस्ताव मराठी भाषा विभागाकडे ३३ वर्षांपासून प्रलंबित होता. मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)