मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या
By admin | Published: August 14, 2016 01:36 PM2016-08-14T13:36:57+5:302016-08-14T13:36:57+5:30
बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत. त्यांना निसर्ग व मानव यांच्यातील बंध या दृष्टीने सृष्टीबंध असे उचित नाव ठेवण्यात आले आहे. या राख्या 25 ते 40 रुपयांमध्ये असून अत्यंत आकर्षक आहेत.
मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, सृष्टी राखीच्या निमित्तानं या भागातले वंचित आदिवासी काय सादर करू शकतात, त्यांची क्षमता काय आहे आणि त्यांच्याकडे कुठली कौशल्ये आहेत हे समोर येतं.
दीबेटरइंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार हे आदिवासी परंपरा जपतात, मानवता राखतात आणि पर्यावरणाचं संवर्धनही करतात असे उद्गार संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सचिव सुनील देशपांडे यांनी काढले आहेत.
मेळघाटमधल्या आदिवासींनी एकत्र यावं आणि वेणू शिल्पी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी असा प्रयत्न या संस्थेने केला. अवघ्या पाच दिवसांच्या प्रशिक्षणानं आदिवासींना सुंदर राख्या बनवता यायला लागल्या, त्याही स्थानिक कच्च्या मालातून असे देशपांडे सांगतात.
1998 मध्ये अवघ्या 15 आदिवासी कारागिरांसह सुरू झालेल्या या चळवळीत आज 450 कारागिर आहेत, आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नैसर्गिक उत्पादनांचा पुनर्निर्मितीत कसा वापर करता येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या राख्या होत. शहरात राहणाऱ्या प्रत्येकानं ही राखी घेतली तर ती या आदिवासींसाठी मदत ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
बांबूच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासींचं जीवनमान बदलू शकतं. मेळघाटातील तवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राकडून या राख्या मागवता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी http://bambooshrushti.com/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.