रोजगाराअभावी आदिवासीची आत्महत्या
By admin | Published: March 14, 2016 02:27 AM2016-03-14T02:27:12+5:302016-03-14T02:27:12+5:30
घरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला
हुसेन मेमन, जव्हार
घरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकुळे (३२) असे या आदिवासीचे नाव असून निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजपर्यंत कसल्याही रोजगाराची नोंद नसल्याचे आढळून आले आहे.
जव्हारपासून (जि़ पालघर) अवघ्या आठ किमीच्या अंतरावर ७०० लोकवस्तीच्या आपटाळे गावातील सुरेश निकुळे (३२) या आदिवासीने १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात स्वत:ला जाळून घेतले. पत्नीला बाहेर काढून आतून दरवाजा बंद केलेला असल्याने त्यांना वाचविण्यास उशीर झाला व ते ९० टक्के भाजले. मात्र रुग्णालयात न्यायला कसलीच मदत मिळाली नाही. सकाळी अंगणवाडी सेविकेने रु ग्णावाहीकेला फोन केल्यावर त्यांना उपचारासाठी जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी वंदना निकुळे यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला आहे .
रोजगाराच्या शोधात इतरत्र फिरूनही आठवड्यातील एखाद्या दिवशीच रोजगार मिळत होता. निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमीच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजतागायत कसल्याही रोजगाराची नोंद नाही. ग्रामपंचायतीने रोजगाराची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला होता पण काहीच कार्यवाही झाली नाही. कृषी, ग्रामपंचायत, तहसील अशा कोणत्याच यंत्रणेचे काम या गावापर्यंत पोहचलेच नाही. तर आदिम जमातीला घरकुल योजना लागू असतानाही त्यांना लाभ मिळाला नव्हता. घरात एक पातेले, तांब्या आणि भाकरी थापायला तवा इतकेच सामान आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघातच ही आत्महत्या घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर राजकारणही सुरू झाले असून सरकारी यंत्रणा न पोहोचल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेऊन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच रोख रकमेची मदत केली. निकुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी घेऊ व मृत सुरेश यांच्या पत्नीला रोजगार देऊ असे जाहीर केले.