डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे आदिवासी कबड्डीपटूचा मृत्यू?; शवविच्छेदनाच्या अहवालाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:31 AM2020-02-03T04:31:01+5:302020-02-03T04:31:16+5:30
हाताच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू
मनोर : लालोंढे फरलेपाडा येथील २३ वर्षीय आदिवासी कबड्डीपटूचा शस्त्रक्रिया झाल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मीलन याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मीलन सुभाष निकोले असे त्याचे नाव आहे. तो कबड्डी खेळत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दाखल केले होते. त्याचा हात फॅक्चर असल्याने शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान, डॉ. सौरभ पुंदे यांनी त्याच्यावर शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यानंतर, त्याला आॅपरेशन थिएटरमधून जनरल वॉर्डमध्ये ठेवले. साडेसहा वाजेपर्यंत मीलन शुद्धीवर आला नाही. त्याच्या तोंडातून रक्त निघू लागले. त्याचा चुलत भाऊ नितेश व वडिलांनी डॉक्टरांना बोलावले. त्याला तपासले असता, त्याचे निधन झाले आहे, असे डॉ.सौरभ पुंदे व डॉ. आदित्य सातवी यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच आमदार विनोद निकोले, लालोंढे गावातील त्याचे नातेवाईक, मित्र व मनोर गावातील नागरिकांनी गर्दी केली. त्याचा मृतदेह आता जे. जे. हॉस्पिटल, मुंबईला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद मनोर पोलीस ठाण्यात केल्याचे मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे यांनी सांगितले.
हाताला मार लागला होता. मात्र, त्याच्या आॅपरेशननंतर तो दगावतो ही गंभीर बाब आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचे निधन झाले आहे. त्या डॉक्टरांवर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल.
- विनोद निकोले, आमदार
त्याच्या हाताचे आॅपरेशन यशस्वीरीत्या पार पडले, परंतु तो शुद्धीवर आला नाही. आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविण्यासाठी अयशस्वी ठरलो. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर समजेल.
- डॉ. आदित्य सातवी, डॉ सौरभ पुंदे