‘बारवी’तील आदिवासी मदतीपासून वंचित
By admin | Published: April 3, 2017 04:06 AM2017-04-03T04:06:24+5:302017-04-03T06:08:43+5:30
बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली.
मुरबाड : बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली. या पीडित कुटुंबांना मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी रुपये दिले. परंतु, एमआयडीसीने पीडितांना मदत न दिल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने धरणातील पाण्याच्या साठ्याची क्षमता वाढवण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवली. गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे तोंडली, काचकोळी, जांभूळवाडा, मारगवाडी, बुरूडवाडी, देववाडी या वाड्या पाण्याखाली गेल्याने आदिवासींना घर सोडून जावे लागले. विस्थापित झालेल्या पीडित कुटुंबांना मदत मिळावी. त्यांना मूलभूत गरजा मिळाव्यात, म्हणून मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी देण्यात आले. त्या वेळी त्यांना तत्काळ मदत म्हणून १० हजार आणि धान्यही दिले. ज्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना प्रत्येक कुटुंबामागे एक ते दीड लाख भरपाई देण्यात आली.
एमआयडीसीने पीडित आदिवासी कुटुंबांना रोख मदत किंवा नुकसानभरपाई न देता ती इतर राज्यांत १० वर्षांपासून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिली. परंतु, पीडित आदिवासी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.
या पीडित कुटंबांपैकी श्रीमंतांना बारवी प्रशासनाने मुरबाडमधील सोसायट्यांमध्ये स्थलांतरित केले. त्यांचे भाडेही तेच भरत आहेत. खरोखर बेघर होऊन विस्थापित झालेल्या आदिवासींना स्थलांतरित न करता त्यांची धरणाच्या शेजारीच पत्र्यांच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली.
सध्या येथेच हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. उन्हाळ््याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात बारवी विभागाचे कार्यकारी अभियंता केंद्रे यांच्याशी संपर्कसाधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
>तोंडली येथील ग्रामस्थांची मागणी एमआयडीसीने फेटाळली आहे. तसेच जी वंचित कुटुंबे आहेत, त्यांना काही दिवसांतच नुकसानभरपाई देण्यात येईल.
-बाळू राऊतराय, उपअभियंता
बारवी धरणाच्या पाण्याने तोंडली येथील सुमारे १२५ घरे बाधित झालेली असताना त्यांनी सुमारे २०० लाभार्थ्यांना भरपाई दिलेली आहे. खरोखर नुकसान झालेले पीडित शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहे.
- हरिश्चंद्र बांगर, ग्रामस्थ