हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

By Admin | Published: January 19, 2017 03:50 AM2017-01-19T03:50:19+5:302017-01-19T03:50:19+5:30

प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता.

Tribute to the green rains in Dombivli Saturday | हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

googlenewsNext


डोंबिवली : प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता. त्याला येत्या शनिवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळात राज्यकर्ते, प्रदूषण मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी काहीही न केल्याने निवासी भागातील नागरिक हा दिवस निषेध दिन म्हणून पाळणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित सरकारी यंत्रणांकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात आलेले नसल्याने २१ जानेवारीला ढिम्म सरकारी यंत्रणाना श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे.
डोंबिवली औद्योगिक निवासी परिसरात राहणारे जागरुक नागरिक राजू नलावडे २१ जानेवारी २०१४ ला मॉनिंग वॉकला निघाले, तेव्हा त्यांना सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मित्र निखील भोईर याने तर एमआयडीसीत सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे त्यांना कळवले. या परिसरात असलेल्या कापड प्रक्रिया उद्योगातून रासायनिक प्रक्रियेच्या वेळी चिमणीवाटे प्रचंड प्रमाणात रासायनिक कण बाहेर पडले. त्यांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यात दव आणि आकस्मिक पावसाचे पाणी मिसळल्याने सारा परिसर हिरवा झाला. त्यातून डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सर्व राजकीय पक्षांना जाग आली. त्यांनी भरपूर घोषणा केल्या. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. चिखलफेक केली. पण हा प्रश्न लावून धरला नाही.
पाठपुरावा केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी सारवासारव केली आणि नंतर कारवाई केली. हिरवा पाऊस नेमका कशामुळे पडला, त्याला कोणती कंपनी जबाबदार होती, याचा शोध घेत ओंकार रंग कंपनीवर मंडळाने कारवाई केली आणि ती कंपनी बंद केली. ती आजतागायत बंदच आहे.
हिरवा पाऊस पडला, तेव्हा त्यावेळी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले होते. सत्ताधारी शिवसेनेची डीएनसी मैदानात प्रचार सभा होती. तिला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी हिरव्या पावसाचा उल्लेख प्रचारसभेत करीत डोंबिवली प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या तीन वर्षात शिवसेनेकडून त्याची पूर्तता झालेली नाही. केंद्राच्या-राज्याच्या सत्तेत शिवसेना आली. महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी भेट देऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते व पर्यावरण खात्याचे मंत्री रामदास कदम यांनी अचानक भेट देऊन यंत्रणेची गाळण उडविली. पण पुढे सूत्रे हलविली जायला हवी होती, तशी ती ती अद्याप हलविली गेलेली नाहीत. सत्ता बदलते. आश्वासने हवेत विरुन जातात. मंत्री येतात. पाहणी करुन जातात. प्रदूषणाचा प्रश्न तसाच राहतो, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
>प्रदूषण रोखण्यातील अपयशाच्या जागृतीसाठीच कार्यक्रम
प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याचा मुद्दा आदी न्यायालयात आणि आता हरित लवादापुढे आहे. त्यातून डोंबिवली, अंबरनाथचे कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कं पन्यांनी प्रक्रिया न करात सांडपाणी सोडायचे नाही, असा निर्णय आहे. अनेक कंपन्यांत पाण्याचा वापर करून छुपे उत्पादन सुरुच आहे. कंपन्या बंदच्या नोटिशीनंतरही रामचंद्रनगरला नाल्यातून रासायनिक सांडपाण्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाला. वायूगळतीचाही प्रकार घडला होता. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाने बंद असतानाही प्रदूषणाची तक्रार हा नागरिकांकडून बाऊ सुरु असल्याचे सांगितल्याने नवा वाद उद््भवला. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना व प्रयत्न होणार नसतील, तर हिरव्या पावसापेक्षाही भयाण घटनेची पुनरावृत्ती डोंबिवलीत होण्याची भीती आहे. त्यासाठीच हिरव्या पावसाच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त निषेधदिन साजरा करुन निष्क्रीय सरकारी यंत्रणांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नागरिक करणार नलावडे यांनी सांगितले.

Web Title: Tribute to the green rains in Dombivli Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.